सावकारी संदर्भात तक्रार असल्यास पोलीसांशी संपर्क साधा-श्रीकृष्ण कोकाटे

बुडीत कर्ज बॅंके विक्री करतात; खाजगी माणुस वसुली करतात
नांदेड(प्रतिनिधी)-सावकारी व्यवसायाबद्दल तो व्यवसाय कायदेशीर असो, बेकायदेशीर असो किंवा बॅंकेचा असो यात बरेच घोळ असतात. तेंव्हा सावकारी बद्दल नांदेड जिल्ह्यातील कोणालाही काहीही तक्रार असेल त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा त्यातील कायदेशीर आणि बेकायदेशीर प्रक्रिया तपासून लगेच कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. बॅंक सुध्दा आपले बुडीत कर्ज विक्री करते आणि ते कर्ज खाजगी लोक वसुल करतात अशी माहिती सुध्दा श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितली.
काल एका दरोडा प्रकरणाची पत्रकार परिषद घेतांना सावकारी व्यवसाय हा विषय समोर आला असतांना श्रीकृष्ण कोकाटे बोलत होते. नांदेड जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त सावकारी परवाने धारक सावकार आहेत. तसेच बेकायदा सावकारी करणाऱ्यांची संख्या तर उपलब्ध नाही. तसेच कोणतीही बॅंक कर्ज दिल्यानंतर एखाद्या कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर ते कर्ज बॅड डेब्डस्‌ या सदरात बॅंकेत जमा होते. या कर्जाला बॅंक विक्री करते. उदाहरणार्थ एका ए माणसाकडे बॅंकेचे 10 लाख रुपये कर्ज असेल तर खाजगी व्यक्ती ते कर्ज बॅंकेकडून 3 लाख रुपयांमध्ये खरेदी करतो. त्यानंतर तो खाजगी व्यक्ती बॅंकेच्या कर्जदाराकडून 10 लाखांची वसुली करतो असे प्रकार सुध्दा घडतात. असे बुडीत कर्ज बॅंकेने विक्री केले असेल आणि त्या बुडीत कर्जाची वसुली खाजगी माणुस करीत असेल तरी सुध्दा जनतेने आमच्याशी संपर्क साधावा.
सावकारी व्यवसाय परवाना धारकाचा असेल, बिना परवाना धारकाचा असेल, बॅंकेचे बुडीत कर्ज खरेदी केलेला असेल या सर्वच प्रकरणांमध्ये बऱ्याच बाबी प्रमाणित पध्दतीनुसार(एसओपी) होत नाहीत. कर्जा संदर्भाने आणि कर्ज परतफेडीसंदर्भाने जिल्ह्यातील जनतेला काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा. त्यातील कायदेशीर आणि बेकायदेशीर बाबींची पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *