जिल्हा परिषद सीईओ मिनल करणवाल यांनी हातात घेतली केरसुणी

नांदेड,(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करणवाल यांनी आज अंगारक संकट चतुर्थीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व परिसरामध्ये स्वच्छता मोहिम राबवली. मिनल करणवाल यांनी स्वत: आपल्या हातात झाडू घेवून आरोग्य विभागाच्या कक्षात साफसफाई केली आणि संबंधीतांना विचारणापण केली. पण असेच साफसफाईचे काम करता काय?


आज अंगारक संकट चतुर्थीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल ह्या कार्यालयात आल्या आणि त्यांनी सर्वांना आदेश दिला की, आप-आपल्या विभागातील साफसफाई पुर्णपणे करायची आहे. त्यांनी आदेश दिला खरा पण सफाई अभियानाला खरी गती आली ती त्यांनी स्वत: आपल्या हातात केरसुणी घेतल्यावर.
मिनल करणवाल यांनी स्वत: आरोग्य विभाग गाठले. जिल्हाभरातील आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी या विभागावर आहे आणि आरोग्यातील सर्वात पहिली पायरी ही स्वच्छता आहे. मिनल करणवाल यांनी आपल्या हातातील केरसुणीने आरोग्य विभागात हात साफ केल्यानंतर तेथून निघालेला कचरा पाहुन त्यांनी विचारणाही केली की, आरोग्य विभागात अशीच सफाई होते काय?
यानंतर सर्व जिल्हा परिषदेत, सर्व विभागांमध्ये केरसुण्यांचा कहर आला आणि सर्वांनीच आपल्या हातात केरसुण्या घेतल्या आणि सर्व जिल्हा परिषद काही क्षणातच चकचक दिसायला लागली. मिनल करणवाल यांनी आज केरसुणी घेवून केलेले काम प्रशंसनिय असले तरी नेहमीच साफसफाई असावी यासाठी त्यांनी काही तरी ठोस उपाय योजना करायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *