25-30 वर्ष युवकाचा खून करून डंकिन परिसरात फेकले

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास गोदावरी नदीकाठी लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीत एका अनोळखी 25-30 वर्ष वयाच्या युवकाचे प्रेत सापडले आहे.पोलीसांचा असा प्राथमिक कयास आहे की, या मयताला कोठे तरी दुसरीकडे मारून त्याचे प्रेत येथे आणून टाकले आहे. या युवकाची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे.
आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास गोदावरी नदीकाठी असलेल्या लिंगायत समाज स्मशानभुमी परिसरात एक अनोळखी प्रेत सापडले. घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे आदी आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. मयत व्यक्ती हा 25-30 वर्ष वयाचा असावा त्याच्या शरिरावर अनेक जागी मारहाणीच्या जखमा आहेत. पण ज्या ठिकाणी प्रेत सापडले. त्या ठिकाणी कोणतेही रक्त सापडले नाही. यावरून या मयताला कोठे तरी दुसऱ्या ठिकाणी मारले असावे आणि त्याचे प्रेत आणून या ठिकाणी टाकले असावे असा पोलीसांचा अंदाज आहे.
मयताच्या शरिरावर काळ्या रंगाचा फुल भायाचा शर्ट आणि मेहंदी रंगाची पॅन्ट आहे. या शिवाय त्याच्याकडे कोणताही असा पुरावा सापडला नाही. ज्यावरून त्याची ओळख पटेल. सापडलेले प्रेत हे फुकलेेले आहे. यावरुन हे प्रेत दोन दिवसांपुर्वी त्या ठिकाणी आणून टाकले असावे असा अंदाज आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी जनतेला आवाहन केले आहे की, अनोळखी मयत व्यक्तीस कोणी ओळखत असेल, कोणाच्या घरातील 25-30 वर्ष वयाचा युवक गायब असेल अथवा सापडलेल्या प्रेता संदर्भाने कोणास काही माहिती असेल तर त्या संदर्भाची माहिती वजिराबाद पोलीसांना द्यावी जेणे करून मयताची ओळख पटविता येईल.
मागील आठ दिवसांमध्ये लिंगायत स्मशान भुमी परिसरात हे दुसरे प्रेत सापडले आहे. मागील मयत हा कंधार तालुक्यातील रहिवासी होता त्याची ओळख पटलेली आहे. परंतू अद्याप त्याचे मारेकरी कोण आहेत याचा थांगपत्ता लागलेला नाही.
या भागात एका प्रार्थना स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्या ठिकाणी एका युवकाचा खून झाला होता आणि एका युवतीला मारहाण करण्यात आली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे त्या 9 आरोपींना पकडण्यात आले होते. नंतर त्या आरोपींनी प्रार्थना स्थळातील महंतांवर दबाव आणून बाहेरचा परिसर टिपणारे सीसीटीव्ही कॅमरे बंद करायला लावले आहेत. डंकीनकडे जाणारा हा रस्ता अत्यंत निर्मनुष्य रस्ता आहे.या भागात गुंडांचा वावर असतो. ज्या ठिकाणी आज प्रेत सापडले त्या ठिकाणी 52 पत्ते सुध्दा मोठ्या संख्येत सापडले आहेत. यावरुन त्या परिसरात पत्यांचा डाव सुध्दा चालतो असे म्हणता येईल. या ठिकाणी किंबहुना या परिसरात पोलीसांची गस्त जास्त स्वरुपात असणे आवश्यक आहे असे स्थानिक रहिवासी सांगतात.

2 thoughts on “25-30 वर्ष युवकाचा खून करून डंकिन परिसरात फेकले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *