खून करून फरार असलेले दोन अज्ञात मारेकरी इतवारा गुन्हे शोध पथकाने 18 तासात गजाआड केले

 

नांदेड,(प्रतिनिधी)-हरूनबाग परिसरात 37 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्यांना इतवारा गुन्हे शोध पथकाने 18 तासाच्या आज गजाआड करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सध्या हे दोन मारेकरी पोलीस कोठडीत आहेत.

दिनांक 15 जून च्या रात्री 11 ते 16 जूनच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजेच्या दरम्यान हारून बाग परिसराततील मोकळ्या जागेत अब्दुल मन्सूर अब्दुल रहीम (37) या व्यक्तीच्या डोक्याच्या पाठीमागील भागात धारदार शस्त्राने हल्ला करून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केल्याची तक्रार त्याचे बंधू यांनी दिली होती. त्यानुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 220/ 2024 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार‌,डॉ. खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध प्रमुख संग्राम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या अज्ञात मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. त्यांच्या 18 तासाच्या अथक परिश्रमांना यश आले आणि त्यांनी फैसलखान आरिफ खान (25) राहणार पाण्याच्या टाकीजवळ चौफाळा नांदेड आणि खाजा खान उर्फ बब्बू ताहेरखान (30)राहणार रंगार गल्ली नांदेड या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी हा खून प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याचे सांगितले. सध्या हे दोन्ही मारेकरी पोलीस कोठडीत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक आदींनी 48 तासात 2 अज्ञात मारेकरी गजाआड करणारे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संग्राम जाधव, पोलीस अंमलदार मोहन हाके, मानेकर, हबीब चाऊस, धीरज कोमलवार, दासरवाड, रेवणनाथ कुळनुरे गायकवाड, बेग यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *