नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस भरती 2022-2023 साठी मैदानी चाचणीत उतरणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शॉर्टकट कोणीही सांगितला तरी तो ऐकू नका कारण तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळणारी संधी गमावून बसाल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस भरती विषयी सांगतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे बोलत होते.याप्रसंगी गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप उपस्थित होत्या.
नांदेड जिल्ह्यात 128 पोलीस शिपाई या पदासाठी आणि 6 बॅन्ड वादक पथकासाठी अशा एकूण 134 जणांची भरती होणार आहे. त्यासाठी 15275 अर्ज आले आहेत. त्यामध्ये 11786 पुरूष पोलीस आणि 3303 महिलांचे अर्ज आले आहेत. बॅन्ड वादक पदासाठी 877 अर्ज आले आहेत. दि.16 जून 2024 ते 3 जुलै 2024 दरम्यान पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 5 वाजल्यापासून मैदानी चाचणीची सुरूवात होईल. पहिल्या दिवशी 705 उमेदवार आणि नंतर दररोज 1200 उमेदवार यासाठी बोलावण्यात आले आहेत.
पोलीस महासंचालकांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस शिपाई, बॅन्ड पथक, वाहन चालक, राज्य राखीव पोलीस बल गट या वेगवेगळ्या पदांसाठी काही उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज भरले असतील तर आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी येणार असेल तर त्यात त्यांना तारीख बदलून देण्यात येईल. तसेच स्थानिक पातळीवर आलेल्या उमेदवारांच्या अडचणींना सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर त्याची सोय करण्यात येईल.
पावसामुळे मैदानी चाचणीत काही अडचण आल्यास त्यासाठी दुसरे मैदान निवडले जाईल आणि उमेदवारांना त्यासाठी पुढील तारीख देण्यात येईल. कोणतेही उत्प्रेरक घेवून उमेदवारांनी मैदानी चाचणीत उतरू नये कारण शंका आल्यास त्यांची वैद्यकीय चाचणी होईल आणि गुन्हे दाखल होतील. त्याचा परिणाम उमेदवारांच्या भविष्यातील जीवनासाठी सुध्दा होईल. जगात कोणताही माणुस तुम्हाला पोलीस भरतीसाठी शॉर्टकट दाखवत असेल तर तुम्ही तो शॉर्टकट वापरू नका. कारण पोलीस भरतीमध्ये ज्या पध्दतीची भरती प्रक्रिया अवलंबण्यात आली आहे. त्यातून शॉर्टकट मिळणे शक्यच नाही. या पोलीस भरतीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गुप्त वार्ता विभाग लक्ष ठेवून असणार आहे. म्हणून कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका. कोणी अशी उत्प्रेरणा देत असेल तर त्यासंदर्भाने टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा जेणे करून उमेदवारांना कोणताही त्रास होणार नाही.
नांदेड जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून मी ही पोलीस भरती अत्यंत नि:पक्षपातीपणे, पारदर्शकपणे करणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दलालांपासून सावध राहावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.