नांदेड(प्रतिनिधी)-मौजे नावंद्याची वाडी ता.कंधार येथे काही घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 51 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच वसरणी येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 54 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अर्धापूर येथील एरीगेशन कॉलनीजवळ एका महिलेला लुटण्यात आले आहे.
नावंद्याची वाडी येथील शिवाजी मारोती केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जूनच्या सकाळी 9 ते रात्री 1 वाजेच्यादरम्यान ते आणि त्यांचे कुटूंबिय आणि त्यांच्या शेजारची मंडळी उकाड्यामुळे गच्चीवर झोपली असतांना त्यांचे घरफोडून चोरट्यांनी रोख रक्कम 60 हजार व सोन्या-चांदीचे दागिणे 91 हजार रुपयांचे असा एकूण 1 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
भाग्यश्री गृहनिर्माण सोसायटी वसरणी येथे राहणारे सुभाषसिंह भय्यालाल भारद्वाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जून रोजी सकाळी 5.30 ते 7 जूनच्या सकाळी 11 वाजेदरम्यान ते आपले घर बंद करून आपल्या मुलाकडे नागपुर येथे गेले होते. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि त्यांचे घरफोडून कपाटातील 1 लाख रुपये रोख रक्कम आणि 54 हजार 400 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत.नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
सुगंधाबाई संतोष भिसे या महिला 8 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता आपले मजुरीचे काम आटपुन अर्धापूर बसस्थानक ते एरीगेशन कॉलनीकडे पायी जात असतांना चार चोरट्यांनी त्यांना रोखून तलवार आणि चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील 1 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरली आहे. जनता आणि पोलीसांनी मिळून सुगंधाबाई भिसेला लुटणाऱ्या निलेश बालाजी बारसे, एक अल्पवयीन अशा दोन जणांना पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी पाठलाग करून त्वरीत पकडले. या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत. या लोकांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 सोबत भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 288/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या सक्षम मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल गिरी हे करीत आहेत.