नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीनगर बायपास, महेबुबनगरजवळ या भागात स्थानिक गुन्हा शाखेने 8 लाख 27 हजार रुपयांचा 41 किलो 350 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हा गांजा अत्यंत पध्दतशीरपणे विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गांजा विक्री करण्याची जागा सांगून स्थानिक गुन्हा शाखेला तेथे छापा टाकण्यासाठी पाठविले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी त्यांच्या शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांच्यासह एक पथक तयार करून त्या ठिकाणी पाठविले. आज 8 जून रोजी पोलीस पथकाने राजपत्रीत अधिकारी नायब तहसीलदार एम.डब्ल्यू. दिगलवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण यांच्यासह लक्ष्मीनगर बायपास गाठले. त्या ठिकाणी एका घरात वेगवेगळ्या डब्यांमध्ये पध्दतशिरपणे बंद करून गांजा ठेवलेला सापडला. हा गांजा एकूण 41 किलो 350 ग्रॅम आहे. याची बाजारातील किंमत 8 लाख 27 हजार रुपये आहे. हा गांजा बाळगणारे अहेमद खान अनवर खान (28) रा.रहिमनगर देगलूर नाका नांदेड, शेख अख्तरी बेग अन्वर खान (55) रा.महेबुनगरजवळ लक्ष्मीनगर बायपास नांदेड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पकडल्यानंतर त्यांनी सांगितले की, जोराबी उर्फ बब्बाखाला अन्वर खान पठाण रा.टायरबोर्ड नांदेड या महिलेने हा गांजा विक्री करण्यासाठी तेथे ठेवला असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीस)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यंत राजरोसपणे गांजाची दुकान थाटणाऱ्या दोन जणांना पकडून कार्यवाही करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सीएम आदींनी पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, महेश बडगु, रणधिरसिंह राजबन्सी, ज्वालासिंग बावरी, मारोती मोरे, सौ.पंचफुला फुलारी, सौ.हेमलता भोयर, शंकर केंद्रे आणि अर्जुन शिंदे यांचे कौतुक केले आहे.