..अन्यथा नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्यात येईल

नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलमधील 6 शिक्षक हे “रिफ्रेन’ प्रकारामुळे काम न करता आणि पगार न मिळता वनवन भटकत आहेत. उपशिक्षण संचालक लातूर डॉ.गणपत मोरे यांनी 9 मे रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांना पत्र पाठविले असून या सहा शिक्षकांना रिफ्रेन काळातील थकीत वेतन मिळवून देण्यासाठी पत्र पाठविले. त्या पत्राला संदर्भ करून शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर यांनी मुख्याध्यापक नागार्जुना पब्लिक स्कुलला 10 मे रोजी पत्र पाठविले आणि रिफ्रेन काळातील वेतन त्वरीत अदा करावे नसता तुमच्या शाळेची मान्यता काढण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा शिक्षण उपसंचालकाकडे सादर करण्यात येईल अशी कडक शब्दात समज दिल्यानंतर सुध्दा आजपर्यंत तरी त्या शिक्षकांना रिफ्रेन काळातील वेतन मिळालेेले नाही. म्हणजे शिक्षणाचा व्यवसाय करून जि मंडळी गडगंज श्रीमंत झाली. त्यांच्या प्रमाणे शिक्षकांना त्यांच्याकडे किती किंमत आहे हे दिसते.
नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. विद्यादान करणे हा वाक प्रचार आता बंद झाला असून विद्येचा धंदा सुरू झाला आहे. त्यानुसार या नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये लाखो रुपये फि घेवून शिक्षण दिले जाते. शाळा प्रशासन तर फक्त फिस वसुल करते. शिक्षण देणारे मात्र शिक्षक असतात. त्यांना मात्र तुटपुंजे वेतन देवून नागार्जुना पब्लिक स्कुल मागील 20 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून आपला कारभार चालवत आहे. या कारभाराला कुठेच निर्बंध नाहीत. ते कोणाचेच आदेश ऐकत नाहीत अशी परिस्थिती आहे. अविनाश चमकुरे, सौ.निशा गुडमेवार यांच्यासह एकूण 6 शिक्षकांना 13 जानेवारी 2023 पासून नागार्जुना पब्लिक स्कुलने रिफ्रेन केले. याचा अर्थ असा होतो की, त्यांनी शिक्षण दानाचे काम करायचे नाही.
सहा शिक्षकांना रिफ्रेन करण्याचे कारण असे आहे की, त्यांनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे वेतन मिळावे म्हणून आवाज उठविला. हा आवाज त्यांनी यासाठी उठवला की, कायद्याप्रमाणे मिळणारे वेतन शिक्षकांच्या बॅंक खात्यात जमा होत होते. परंतू दुसऱ्याच दिवशी त्यांना रोखीने आलेली अतिरिक्त रक्कम पुन्हा शाळेत जमा करावी लागे. या संदर्भाचे काही व्हिडीओ सुध्दा शिक्षकांकडे उपलब्ध आहेत. वेतन मिळाले नाही तर कुंटूंबाचा उर्दनिर्वाह कसा चालवावा हा प्रश्न या सहा शिक्षकांना भेडसावत होता. म्हणून त्यांनी कायद्याने त्यांच्यासाठी मोकळ्या ठेवलेल्या प्रत्येक सक्षम अधिकाऱ्यासमोर आपले दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात सुध्दा ते शिक्षक गेले. परंतू नागार्जुना पब्लिक स्कुलचे शाळा व्यवस्थापन या शिक्षकांना भिक घालत नव्हते.
शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे या शिक्षकांनी केलेल्या अर्जाप्रमाणे शिक्षण उपसंचालक लातूर कार्यालयाने 9 मे 2024 रोजी जावक क्रमांक 3238 नुसार एक पत्र शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांना पाठविले. त्यात 13 जानेवारी 2023 पासून रिफ्रेन असलेल्या सहा शिक्षकांचे वेतन देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला बाध्य करावे असे लिहिले आहे. शिक्षण आयुक्त पुणे यांनी सुध्दा या प्रकरणाची तपासणी करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत असे उपसंचालकांच्या पत्रात लिहिले आहे.
या पत्राला अनुसरून नांदेड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी 10 मे 2024 रोजी जावक क्रमांक 2194 नुसार मुख्याध्यापक नागार्जुना पब्लिक स्कुलला पत्र पाठविले आहे आणि रिफ्रेन काळातील सहा शिक्षकांना त्यांचे वेतन तात्काळ अदा करावे असे म्हटले आहे. वेतन अदा न केल्यास शाळेची मान्यता काढण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात येईल असे या पत्रात नमुद आहे.
आज 22 मे आहे. तरी सुध्दा या शिक्षकांना रिफ्रेन काळातील वेतन मिळालेले नाही. काय गमक असेल या मागे हे शोधण्याचे शिक्षण विभागाला गरज आहे. कारण शिक्षण विभागाचे आदेश कैराच्या टोपलीत टाकून नागार्जुना पब्लिक स्कुलचे शाळा व्यवस्थापन का निगरगट्ट बनले आहे याचा शोध शिक्षण विभागाने घेण्याची गरज आहे. म्हणजे हे दिसेल की, त्यांच्या आदेशाला कैराची टोपली कोणाच्या आधारावर दाखवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *