ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजीचा, आज ते वयाच्या 70 व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत.
ऍड. बाळासाहेबांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वकिली क्षेत्रात व्यवसाय सुरु केला. त्यातून वेळ काढून १९८२ पासून सार्वजनिक जीवनात अधिकचा वेळ द्यायला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात ‘ भारतीय बौद्ध महासभा ‘ तदनंतर ‘ सम्यक समाज आंदोलन ‘ या मंचावरून जनतेशी संवाद साधीत १९८४ला भारतीय रिपब्लिकन पक्ष ( भारिप ) ह्या पक्षाची स्थापना केली.२०१९ ला वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे या महाराष्ट्र विधिमंडळाने सर्वानुमते घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी या मागणीकरिता १७ वर्ष नामांतरवाद्यांचा प्रदीर्घ लढा चालू होता. ऍड. बाळासाहेबांनी मराठवाड्यातील ओबीसी, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती,बौद्ध,मुस्लिम समूहांशी समन्वय आणि संवादातून कोंडीतून बाहेर काढला. त्यातूनच पुढे १९९३ च्या नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने प्रचंड मोर्चा काढून या मोर्चात ‘नामांतर, नामांतर / नाहीतर सत्तांतर’ ! ही ऐतिहासिक घोषणा दिली. या सर्वांच्या परिणाम म्हणूनच १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर १४-एप्रिल आंबेडकर जयंती, ६-डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, १-जानेवारी भिमा कोरेगाव शहिद स्मृती दिन,
बुद्ध पौर्णिमा, धम्मचक्र परिवर्तन दिन या विशेष दिनी आंबेडकरी समाज लाखोंच्या संख्येने स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे जमा होतो आणि येथूनच नवी प्रेरणा, नवी उर्मी-नवी ऊर्जा घेत असतो. वरील पाच दिनी जमलेल्या आंबेडकरी जनतेसमोर रिपब्लिकन पक्षाचे नेते व्यासपीठे उभारून भाषणबाजी करतात तीच त्यांची राजकीय कृती आणि तोच त्यांचा राजकीय पक्ष आणि समोरची जनता म्हणजे आपलीच राजकीय शक्ती ह्या स्वतःलाच फसवणाऱ्या फसवेगिरीला नाकारून अश्या प्रसंगी ऍड बाळासाहेब स्व-पक्षाचे कार्यक्रम टाळून सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ पाहून संबंधित कार्यक्रमांच्या मंचावरून भूमिका मांडत असतात.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर केवळ स्वतःच्या खासदारकीकडे भावनिकतेतून व आत्मकेंद्रित वृत्तीकडून पाहत नाहीत. १९८४ ते १९९५ असे तीन वेळा अत्यंत कमी मतांनी खासदारकीला पराभूत होऊनही राजकीय तडजोडी स्वीकारल्या नाहीत. पुढे त्यांनी राज्यसभा व लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर विविध प्रश्नांवर चळवळी-आंदोलने उभे करून ” जनभावना आणि मूलभूत प्रश्न ” यांचा समतोल सांभाळताना दिसून येतात. अत्यंत कसबी-सर्जनशील नेता हे सूत्र त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभापासून पाळलेलं आहे. त्यामुळेच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी-तत्वज्ञानाच्या भाष्यकाराची भूमिका बजावत असल्याचे देशपातळीवर एकमेव नेतृत्व म्हणून दिसून येत आहेत. अश्या महान नेत्यास उदंड आयुष्य लाभो, हीच जन्म दिनी सदिच्छा !
– राजू सोनसळे, नांदेड.