नांदेड(प्रतिनिधी)-एका युवतीला मी तुझ्या प्रेम करतो तु माझ्यावर का करत नाहीस असे म्हणून एका युवकाने तिच्यावर जिवघेणा हल्ला केला. या प्रकरणाच्या सत्र खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी युवतीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या युवकाला जन्मठेप आणि 55 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.31 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास पिडीत युवती पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत आपल्या मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करत असतांना प्रकाश उर्फ बिट्या विश्र्वंभर क्षीरसागर (27) या युवकाने वाढदिवसात येवून पिडीत युवतीला सांगितले की, मी तुझ्यावर खुप प्रेम करतो तु माझ्यावर का करत नाहीस, मला का बोलत नाही असे बोलत बोलत त्याने आपल्या जवळील खंजीराने युवतीच्या शरिरावर वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर वार करून तिला जखमी केले.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश होळकर यांनी करून प्रकाश उर्फ बिट्या विश्र्वंभर क्षीरसागर विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हे प्रकरण सत्र खटला क्रमांक 106/2021 नुसार चालले.उपलब्ध झालेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी पिडीत युवतीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या प्रकाश उर्फ बिट्या विश्र्वंभर क्षीरसागरला भारतीय दंड संहितेच्या कलम 307 प्रमाणे जन्मठेप आणि 25 हजार रुपये रोख दंड, कलम 324 प्रमाणे तीन वर्ष शिक्षा आणि 10 हजार रुपये रोख दंड, कलम 354(अ) प्रमाणे तीन वर्ष शिक्षा आणि 10 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 354(ब)प्रमाणे तीन वर्ष शिक्षा आणि 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची एकूण रक्कम 55 हजार रुपये होत आहे. या खटल्यात नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार चंद्रकांत पांचाळ यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.