नांदेड रेल्वे पोलीसांनी गुन्हा “बर्क’ करण्यासाठी लढवली नवीन शक्कल;16 वर्षीय बालिका आठ दिवसापासून गायब आहे, गुन्हा दाखल होत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-एक 16 वर्षीय युवती 27 एप्रिल रोजी नांदेडच्या रेल्वे स्थानकातून गायब झाली. पण त्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यासाठी नांदेड रेल्वे पोलीसांनी नकार तर दिलाच उलट त्या बालिकेच्या आईला मार्गदर्शन पण केले. की, मुलगी रेल्वेतून गायब झाली असे न सांगता ती घरातून गायब झाल्याचा अर्ज ती महिला राहते त्या पोलीस ठाण्यात द्यावा म्हणजे तिचा गुन्हा दाखल होईल. खरे तर महिलेला आपल्या बालिकेला कोणी नेले हे सुध्दा माहित आहे. तरी पण आपले हात झटकण्याची नांदेड रेल्वे पोलीसांची किमया राज्यातील सर्व पोलीसांना आली तर किती छान होईल. म्हणजे गुन्हे कमी दाखल होती.
एका महिलेने मोबाईल फोनवर दिलेल्या  माहितीनुसार ती विधवा आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. दि.27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ति आपल्या तिन्ही लेकरांसह औरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आली. त्यावेळी त्यांचा ओळखीचा गणेश दिगंबर खुणे रा.चाभरा ता.अर्धापूर हा युवक पण होता. त्या युवकानेच सर्वांचे औरंगाबादचे तिकिट काढले आणि ते तिकिट त्याच्याकडे ठेवून घेतले. नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये गर्दी जास्त होती, म्हणून आई आणि दोन मुले एका डब्यात बसली, आणि ती बालिका तिचे वय आज 16 वर्ष आहे. हे दोघे गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही मागच्या डब्यात बसतो असे सांगून मागच्या डब्यात बसले. नंदीग्राम एक्सप्रेस मुंबईकडे जाण्यासाठी निघाली पण दरम्यान महिला मोबाईलवर सचिन गणेश खुने आणि आपल्या बालिकेला बोलत होती. त्यांचे हे बोलणे जालना पर्यंत सुरू होते. पण जालना नंतर बालिकेकडे आणि त्या मुलाकडे असलेला मोबाईल बंद दाखवू लागला. औरंगाबाद रेल्वे स्टेशन आल्यावर महिलेने घडलेला प्रकार औरंगाबाद रेल्वे पोलीसांना सांगितला. औरंगाबाद रेल्वे पोलीसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला आणि तिची दोन मुले दिसत होती. मुलगी मात्र दिसली नाही. आपल्या ओळखीच्या पोरा सोबतच गेली आहे असे समजून महिला आपल्या देवदर्शनासाठी गेली आणि परत रेल्वे स्थानक औरंगाबाद येथे आली. औरंगाबाद रेल्वे पोलीसांनी महिलेच्या हकीकती प्रमाणे मुलगी  नांदेड रेल्वे स्थानकातून गायब झाली होती. म्हणून तेथे तक्रार देण्यास सांगितली.
त्यानंतर  ती महिला नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात आली. तेंव्हा नांंदेड रेल्वे पोलीसांनी तिले सांगितले की, गुन्हा तुझ्यावरच दाखल होईल, तुझ्या ईज्जतीचे काय? असे अनेक संबंध नसलेले शब्द उच्चारून तिला औरंगाबाद जालना, मनमाड, येथे जाण्यास सांगितले. रेल्वे पोलीस नांदेड येथील काही पोलीस तिला सांगत होते की, काल तु कोणाला बोललीस तो मी आहे काय? नाही तर ज्या बोललीस त्याला विचार हे सांगत सांगत नांदेडच्या रेल्वे पोलीसांनी त्या महिलेला एक सुचना केली. तुझे गाव ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे तेथेच जाऊन तक्रार दे, मुलगी रेल्वे स्टेशन नांदेडमधून गायब झाली असे न सांगता घरातूनच निघून गेल्याचे सांग. नांदेड रेल्वे पोलसीसांच्या सुचनेप्रमाणे ती महिला नांदेड जिल्ह्यातील आपले घर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे त्या पोलीस ठाण्यात गेली. जी घडलेली हकीकत आहे. तेथील ठाण्यातील अधिकाऱ्यांना सांगितली. महिलेच्या सांगितल्याप्रमाणे संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकारी काहीच करू शकत नाहीत. त्यानंतर तिने वास्तव न्युज लाईव्हला या बाबत आपल्या मोबाईल क्रमांक 7414989785 यावरुन माहिती दिली. त्या आधारावरच ही बातमी आम्ही लिहिलेली आहे.
एक 16 वर्षीय बालिका घरातून गायब झाली असली तरी त्या संर्दीाने गुन्हाच दाखल करावा लागतो. नांदेड रेल्वे पोलीसांनी 27 एप्रिलचे सीसीटीव्ही फुटेज का तपासले नाहीत? पिडीत महिलेला, औरंगाबाद, जालना, मनमाड येथे का पाइविले? हे प्रश्न महत्वाचे आहेत. रेल्वे पोलीस दलात अपर पोलीस महासंचालक या पदावर प्रज्ञा सरवदे या नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या अधिकारीही कार्यरत असतांना गुन्हा ‘बर्क’ करण्याचा प्रकार नांदेड रेल्वे पोलीसांनी केला आहे.  आपण असे समजूया की महिला खोटे बोलते आहे. तरी पण फौजदारी प्रक्रिया संहितेने ‘ब’ फायनल हा पर्याय सुध्दा पोलीसांना दिलेला आहे. तरी पण नांदेड रेल्वे पोलीसांनी लढवलेली शक्कल राज्यभरातील किंबहुना देशभरातील पोलीसांनी अवलंबली तर गुन्ह्याचा आकडा किती कमी होईल? त्यासाठी नांदेड रेेल्वे पोलीसांची प्रशांसच केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *