नांदेड(प्रतिनिधी)-107 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि कामगारांच्या ताकतीवरच समाज व्यवस्था कष्टावर उभी राहिली. या दोन दिनानिमित्त शुभकामना देतांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले. आम्हाला या बाबीचा अभिमान असायला हवा.
आज शासनाच्यावतीने मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय नांदेड येथे पार पडला. या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम. यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
परेड कमांडर देगलूरचे पोलीस उपअधिक्षक गोसावी आणि द्वितीय परेड कमांडर राखीव पोलीस निरिक्षक विजयकुमार धोंडगे यांनी कवायतीचे नेतृत्व केले. या कवायतीत केंद्रीय राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार, होमगार्ड महिला पथक, राष्ट्रीय छात्रसेनेचे पथक, अग्नीशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस बॅन्ड पथक आदींनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर मुख्य अतिथी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परेडचे निरिक्षण केले.
याप्रसंगी पुढे बोलतांना संतांची भुमि असलेल्या महाराष्ट्राची स्थापना 65 वर्षापुर्वी झाली. त्यासाठी सुध्दा मोठा लढा द्यावा लागला आणि या लढ्यात 107 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच आज आम्ही अत्यंत दिमाखदार पणे जीवन जगत असलेल्याचे अभिजित राऊत म्हणाले. या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून अभिजित राऊत यांनी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभकामना प्रेषित केल्या.
या कार्यक्रमात सौ.स्नेहल कोकाटे, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, डॉ.अश्र्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सहाय्यक आयुक्त गिरीश कदम यांच्यासह जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महसुल विभाग, महानगरपालिका या कार्यालयांचे अनेक विभाग प्रमुख हजर होते. व्यासपीठावरील मान्यवरांनी परेड संपल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून त्यांना शुभकामना दिल्या.