उत्कृष्ठ कामगिरी बाबत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव 

नादेड :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी समस्त जिल्हावाशियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, श्रीमती किर्तीका अन्य वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियाची उपस्थिती होती.

 

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेला आदर्श तलाठी पुरस्कार उमाकांत दत्तराम भांगे यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व 5 हजार रुपयाचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे जिल्हा अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी ज्ञानेश्वर सुर्यवंशी व निलेश निवृत्ती काबंळे यांना उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर संकेत सतीश गोसावी व सेकंड परेड कमांडर विजयकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, दंगा नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, राष्ट्रीय छात्रसेना, पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड, मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, अग्नीशामक वाहन, 108 रुग्णवहिका यांचा पथसंचलनात सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. तत्पूर्वी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा आयुक्त कार्यालयात आज ध्वजारोहण संपन्न झाले.

तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून जाहिर केलेले पुरस्कार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. दिलीप पुनमचंद जाधव, दहशतवाद विरोधी पथक नांदेड, पंढरीनाथ मुदीराज, वाचक शाखा, विक्रम बालाजीराव वाकडे, ग्रामीण पोलीस स्टेशन, संतोष विश्वनाथ सोनसळे, पोलीस मुख्यालय नांदेड, मो. असलम मो. हनिफ, एटीबी नांदेड, सिद्धार्थ पुरभाजी हटकर, नागरी हक्क संरक्षण नांदेड, दिनेश पारप्पा वसमतकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *