नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्तीनंतर घरातील कामामध्ये जास्त लुडबुड करण्यापेक्षा आपल्याला ज्या कामामध्ये आनंद आहे अशी कामे करा असा सल्ला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज सेवानिवृत्त झालेल्या 13 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना दिला.
आज आपल्या नियत वयोमानाप्रमाणे पोलीस दलातून 13 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांच्याशी संवाद साधतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे बोलत होते. याप्रसंगी आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पेालीस निरिक्षक उदय खंडेराय यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले, पोलीस सेवा करतांना तुम्ही आपल्या कुटूंबाला, नातलगांना वेळ देऊ शकला नाहीत, त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये जाऊ शकला नाहीत. त्यांचा रोष आजही तुमच्यावर आहे. आता तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे की, कुटूंबाला वेळ द्या, नातलगांना वेळ द्या जेणे करून त्यांचा रोष संपेल. सेवानिवृत्तीत असतांना तुम्हाला दररोज कामाची सवय लागली आहे. ते काम करतांना तुम्ही कोणाचे सन्मानही केले आहेत. कोणावर आक्षेपही घेतले आहेत. पण आता सेवानिवृत्तीनंतर काहीच काम नाही म्हणून घरातील मुले, मुली, सुना, जावई यांच्या कामात लुडबुड करू नका नाही तर त्यांना असे वाटेल की, हे पोलीस सेवेत होते तेच छान होते. आपल्याला पुढील कालखंड जगण्यासाठी कोणता तरी छंद बाळगा जीवनात अनेकदा आपल्या आवडीच्या ठिकाणी जायला मिळाले नाही. आता त्या आवडीच्या ठिकाणी जा, पर्यटन करा. जो एकदा पोलीस होतो तो कायमचा पोलीस असतो. या नियमाप्रमाणे आजही आपल्याला जनतेची सेवा करता येईल त्यावर काम करा.आम्हाला गरज पडेल तेंव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवू आणि तुम्हाला तसेच तुमच्या कुटूंबियांना गरज पडल्यास आम्ही आणि नांदेड जिल्ह्याचे पुर्ण पोलीस दल तुमच्या मदतीसाठी कटीबध्द असल्याचे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.
याप्रसंगी पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे, प्रमोद नासरे आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नासर पठाण यांनी आपल्या जीवनाची मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे यांच्या सुपूत्री सत्यश्री यांनी पोलीस असणाऱ्या वडीलांसोबत आपले जीवन कसे जगलोत याचे सविस्तर वर्णन केले. याप्रसंगी पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार म्हणाले की, आपण पोलीस खात्यात नोकरी करून अनेकांना न्याय दिला आहे. त्या सर्वांच्या शुभकामना तुमच्या सोबत आहेत. आपण कुटूंबाला वेळ कमी दिला असेल परंतू ज्यांना खऱ्या अर्थाने तुमच्या वेळेची गरज होती. तो वेळे त्यांना तुम्ही दिलेला आहे. याप्रसंगी पोलीस निरिक्षक उदय खंडेराय म्हणाले की, तुम्ही आपल्या सेवाकाळात केलेल्या चांगल्या कामाची फळे आज तुम्हाला उत्कृष्ट सेवानिवृत्ती झाल्यानंतर कळेल. त्यात आता तुम्ही कुटूंबासाठी भरपूर मेहनत केली आता तुमच्या नंतरच्या पिडीतील कुटूंब तुमच्यासाठी चांगले करतील. आपण नोकरीला लागलो तेंव्हा किती धडपड केली याला आठवा म्हणजे आज आपण उत्कृष्ट रित्या सेवानिवृत्त झालो आहोत हे आपल्याला कळेल असे खंडेराय म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते पाटील यांनी केले. पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
आज सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. पोलीस उपनिरिक्षक रमेश शंकरराव खाडे-जीपीयु नांदेड, प्रयंचालक ए.डी.सय्यद-बिनतारी संदेश विभाग, श्रेणी पोलीस उपनिरिक्षक नारायण शेषराव कांबळे-पोलीस ठाणे देगलूर, राजेश प्रभाकर चौधरी-श्वान पथक, प्रमोद देवराव नासरे-पोलीस ठाणे हदगाव, प्रविण सुधाकरराव पिंपरकर- पोलीस मुख्यालय, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजयालक्ष्मी राजेश्र्वर कुलकर्णी-पोलीस नियंत्रण कक्ष, गौतम शंकरराव गवारे-पोलीस ठाणे मुक्रामाबाद, संजीव ज्ञानोबा भगत-पोलीस मुख्यालय, धोंडीराम शंकरराव केंद्रे- पोलीस ठाणे वजिराबाद, दिलीप जळबा चित्ते-पोलीस ठाणे सोनखेड, पोलीस अंमलदार नासेर अलीखान जब्बार खान पठाण-पोलीस मुख्यालय, अनिलकुमार अमृतराव भद्रे-पोलीस मुख्यालय नांदेड असे आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलाने या सर्व सेवानिवृत्तांचा सहकुटूंब सन्मान करून त्यांना निरोप दिला.