लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा; केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष

सहा नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी मतदारापासून आयोगापर्यंत संपर्कात

नांदेड- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार ४१ मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसविली आहे. ५० टक्के मतदान केंद्रांवरील मतदानादिवशीची प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येणार आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार ६२ मतदान केंद्र आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील १ हजार ३५९ मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची सुविधा केली आहे. याव्दारे या मतदान केंद्रावरील हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात बसून पाहता येणार आहेत. हिंगोली मतदार संघातील किनवट तालुक्यातील १६४ तर हदगाव तालुक्यातील १६९ मतदान केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे.

वेबकॉस्टिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे सनियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रफुल्ल करर्णेवार यांच्या मार्गदर्शनात हा कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे कक्षाचे प्रमुख असून सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार यांच्यासह शिवानंद स्वामी, मिरज धामणगावे, शाहेद हुसेन, विठ्ठल लाड आदी परिश्रम घेत आहेत. विधानसभा मतदारसंघनीय वेबकॉस्टिंग चालू असलेल्या मतदान केंद्रांवर काही अनुसूचित प्रकार निदर्शनात आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

*सहा नियंत्रण कक्षातून निगराणी*

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाच्या दिवशी ६ नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार आहे.

यामध्ये १. निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, २. माध्यम कक्ष, ३. ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्ष, ४. वेब कास्टिंग, ५. एनकोर कक्ष ६. कम्युनिकेशन कक्ष

यामधील निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष व माध्यम कक्ष मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी वृत्तवाहिन्यावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती देणे व वृत्तपत्रांना आकडेवारी देण्याचे काम करणार.

ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्षाद्वारे ईव्हीएम वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्या जाते. ईव्हीएम घेऊन जाणारी वाहने कुठे आहेत. त्यांचे लोकेशन काय आहे ,यावर या कक्षामार्फत नियंत्रण ठेवल्या जाते.

वेब कास्टिंग कक्षाद्वारे प्रत्येक विधानसभा निहाय ५० टक्के केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येते. याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व संबंधित केंद्रांवर सुरू असलेल्या हालचालीवर नियंत्रण ठेवल्या जाते.

एन्कोर कक्षामार्फत निवडणूक आयोगाला दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी दिली जाते. विहित नमुन्यातील ही टक्केवारी आयोगाला वेळेत सादर करण्याची जबाबदारी या समितीकडे आहे.

कम्युनिकेशन कक्षामार्फत इतर सर्व कक्षाशी समन्वय ठेवण्यात येईल व जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी सर्व ठिकाणीची माहिती दिल्या जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *