नांदेड(प्रतिनिधी)-बळेगाव ता.देगलूर येथे एका दरोडेखोराला गावकऱ्यांनी झाडाला बांधून मारल्यानंतर पोलीस पोचले आणि त्यास गावकऱ्यांच्या तक्रारीवरुन अटक झाली. अटक झाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले म्हणून पोलीसांनी त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची घोषणा केली. त्यामुळे देगलूर पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
काल दि.19 एप्रिलच्या रात्री बळेगाव ता.देगलूर येथे मरीबा निवृत्ती भुयारे (25) हा जबरी चोरी करीत असतांना गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि झाडाला बांधून त्याला मारहाण केली. मारहाण भरपूर होत असल्याने ही घटना पोलीस पाटलांनी पोलीस ठाणे देगलूर येथे कळवली. त्यानंतर पोलीस आले आणि गावकऱ्यांच्या तावडीतून त्याला सोडून नेले. त्याच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करतांना पोलीसांनी त्याला कोण मारत होते. याचीही नोंद केली आहे. पण दाखल झालेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम 392 या प्रकरणात मरीबा निवृत्ती भुयारेला अटक झाली. अटक फॉर्म भरतांना तो सांगत होता की, मला त्रास होत आहे. पण प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्याला दवाखान्यात नेण्यास थोडा उशीर झाला. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची घोषणा केली.
त्यानंतर पोलीसांनी मयत मरीबा निवृत्ती भोयारे याला मारहाण केल्याप्रकरणी काही नावांसह आणि काही अज्ञात लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विश्र्वंभर झुंजारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. वृत्तलिहिपर्यंत खून प्रकरणात कोणाला अटक झाली नव्हती.