कायद्याशी खेळण्याची वल्गना करणाऱ्या नांदेडच्या वकीलाला बार्शी न्यायालयाची चपराक

नांदेड(प्रतिनिधी)-आम्ही दररोज कायद्याशी खेळतो अशी वल्गना करणाऱ्या एका नांदेडच्या वकीलाला बार्शी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका निर्णयानंतर मोठीच चपराक बसली आहे. इतरांच्या घरांना आगी लावून त्या आगीची शेकोटी करण्याची सवय असणाऱ्या या वकीलाच्या घरात सुध्दा आता आग लागली आहे. त्या आगाची शेकोटी आता लोक करतील.
सन 2022 मध्ये नांदेड शहरातील एका कुटूंबात कौटुंबिक कलह झाला. हा कलह सामोपचाराने निपटून घेणे ही कुटूंबियांची आणि समाजाची जबाबदारी असते. पण प्रकरण जास्तच झाले असेल तर ते प्रशासनाकडे अर्थात पोलीसांकडे जाते आणि अशा प्रकरणांची अखेर वाटच लागत असते. काही अंशी अशी प्रकरणे पोलीस आपली मेहनत लावून निपटून टाकतात.पण त्यात कोणी तेल ओतण्याचे काम करतच असेल तर पोलीसांना सुध्दा ते करणे अशक्य असते. असेच नांदेडच्या प्रकरणात पती-पत्नीमध्ये झालेला वाद एका वकीलाच्या मदतीने बार्शी पोलीसांकडे गेला. कारण ती महिला मुळ राहणारी बार्शीची होती. भारतीय दंड संहितेच्या कलम 498 नुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्या वकीलाकडे मुलाच्या कुटूंबियांनी हे प्रकरण संपवून टाकण्यासाठी विनंती केली असता. त्या वकीलाने त्यांना अत्यंत घाणेरड्या शब्दात वागणुक दिली. भारतीय संस्कृतीने शिकवलेले मोठे आणि लहान या नात्यांना विसरुन त्या वकीलाने मुलाच्या नातलगांना सुध्दा अत्यंत वाईट शब्दात वागणूक दिली. या कुटूंबातील दोन्ही भावांना भिक मागायला लावील, रस्त्यावर आणील, बालके महिलेला मिळवूनच देईल अशा अनंत वल्गना करत त्रास दिला. त्रासाला कंटाळून मुलाचे कुटूंबिय बरेच दिवस परेशान राहिले.
यानंतर या प्रकरणात एका तिसऱ्या व्यक्तीने सहभाग नोंदवला आणि वकीलाच्या पार्श्वभागाची आग झाली. त्या माणसाची सुध्दा वकीलाने भरपूर बदनामी केली. परंतू तो माणुस या मुलाच्या कुटूंबियांना मदत करणार म्हणून कायमच राहिला. त्या प्रकरणात नवीन माणसाची इंट्री झाली तेंव्हा त्या वकीलाने त्या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 354, भारतीय तंत्रज्ञान कायदा जोडून घेतला. बार्शीमध्ये सुध्दा काही राजकीय लोकांचा हात या प्रकरणात जोडून घेतला. त्यामुळे काही पोलीस हातबल झाले आणि मुलाच्या कुटूंबियांना कसा त्रास देता येईल यासाठी प्रयत्न करू लागले. परंतू म्हणतात ना तुमची वृत्ती चांगली असेल अशा परिस्थितीत तुम्हाला काही त्रास होणारच नाही.
या प्रकरणात महिलेच्यावतीने बार्शी न्यायालयात फौजदारी अर्ज क्रमांक 282/2022 दाखल करण्यात आला. या अर्जात कौटूंबिक हिंसाचार कायद्यातील तरतुदींचा उपयोग करून त्यावेळेस पतीकडे असलेल्या दोन बालकांचा तातपुर्ता ताबा मागितला. हा ताबा फक्त पतीवरील आरोपांमुळे न्यायालयाने पत्नीला देण्याचे आदेश दिले. या बद्दल पतीने पुन्हा जिल्हा न्यायालय बार्शी येथे अपील केले. त्या अपीलात सुध्दा जिल्हा न्यायाधीशाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश कॉपीपेस्ट करून मुलांचा ताबा महिलेकडे देण्यास सांगितला.
प्रकरण उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात नवऱ्याच्या वतीने रिट याचिका क्रमांक 2569/2023 दाखल करून नवऱ्याने न्याय मागितला. न्यायालयात प्रकरण सुरू असतांना समाजातील काही दीडशाहण्यांनी हे प्रकरण आपसात सामोपचाराने मिटवू असा प्रस्ताव आणला. त्यात दोन्ही बालके बाईला द्यायची आणि मोठी रक्कम द्यायची असा तो प्रस्ताव होता. पण उच्च न्यायालयात प्रकरण असल्याने त्यात जास्त चर्चा झाली नाही. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा अभ्यास केला असता एक महत्वाची बाब उभय पक्षांकडे मांडली. ज्यामध्ये तुम्ही दोघेही एक दुसऱ्यावर आरोप करत आहात. हे आरोप हा पुराव्याचा भाग आहे. आज जे प्रकरण आमच्यासमोर आहे. त्यानुसार मुलांचे हित (वेलफेअर) जास्त महत्वाचे आहे. ज्यावर उभय पक्ष बोलत नाही. त्यानुसार उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बार्शी यांच्याकडे पाठविले आणि त्यांना आदेशित केले की, बालकांचे हित लक्षात घेवून नव्याने या प्रकरणाचा निकाल द्यावा. जुने दोन्ही निकाल रद्द करण्यात आले आहेत आणि नव्याने या प्रकरणाचा निकाल देतांना सविस्तर कारणांसह निकाल द्यावा. तो सुध्दा तीन आठवड्यात असे बंधन टाकून उच्च न्यायालयाने हे प्रकरण बार्शी न्यायालयाकडे पाठविले.
उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने बार्शी प्रथमवर्ग न्यायालयाने हे प्रकरण दररोजच्या बोर्डमध्ये ठेवले. त्यात उभय पक्षांनी आप-आपल्यावतीने शपथपत्र दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने मुलांना बोलण्याची काही इच्छा व्यक्त केली नाही आणि आपला निकाल देतांना सांगितले की, ज्या एखाद्या मुलाची शाळा बदलणे, त्यानंतर त्यावर होणारे परिणाम हे विपरीत होतील. तसेच नवऱ्याकडे घरात असलेल्या कुटूंबियांमध्ये असणाऱ्या तिन महिला या मुलीच्या देखरेखीसाठी सक्षम आहेत. तसेच या प्रकरणातील मुलीचे वय 12 वर्ष आणि मुलाचे वय 7 वर्ष आहे. त्यानुसार वार्डशिप कायदाप्रमाणे मुलांचे वय पाहता त्यांचा नैसर्गिक पालक वडीलच आहेत असा उल्लेख आपल्या निकालात केला. महिलेच्यावतीने देण्यात आलेल्या शपथपत्रांतील नातलगांचे विश्लेषण करतांना न्यायाधीशांनी दोन जण हे तिचे नातलग नाहीत आणि दोन नोकरीनिमित्त पुण्याला राहतात याचाही उल्लेख केला. नांदेड हे जिल्हास्थान आहे, बार्शी हे तालुकास्थान आहे म्हणून बार्शीपेक्षा जास्त सुविधा नांदेडला उपलब्ध असतील याचाही उल्लेख न्यायालयाने आपल्या निकालात केला.
महिलेच्यावतीने शाळेतील मुलांच्या गैरहजेरी बद्दल व्यक्त करण्यात आलेल्या शंकेचे निरसन करतांना बार्शी प्रथमवर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांनी कायद्याचे प्रकरण सुरू असतांना झालेल्या धावपळीतील ती मुलांची गैरहजेरी आहे असे लिहिले तसेच पुढच्या वर्षी मात्र मुले नियमितपणे शाळेत हजर आहेत आणि त्यांचा निकाल पण चांगला असल्याचा उल्लेख केला. एकंदरीत निशाणी क्रमांक 19 वर हा आदेश करतांना न्यायाधीशांनी दोन बालकांचा ताबा पत्नीला देण्यास नकार दिला.
या सोबतच बार्शी दंडाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती सौ.शर्मिला देशमुख यांनी मुलांची आणि आईची भेट ज्या पध्दतीने ठरवली होती ती पध्दत कायम ठेवली. बार्शी न्यायालयात हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जहांगिर पठाण यांनी निकाली काढले. या प्रकरणात बार्शी येथील महिलेच्यावतीने ऍड. ए.आर.पाटील यांनी बाजू मांडली आणि नांदेडच्या मुलाच्यावतीने ऍड.एस.एस.जाधवर यांनी काम पाहिले. याप्रकरणातील मुलाने वास्तव न्युज लाईव्हला एकच वाक्य सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं।
एका घरगुती प्रकरणाला रस्त्यावर आणून दोन कुटूंबाची बदनामी करण्याचे एक सुंदर कृत्य नांदेडच्या दुसऱ्या पिडीतील एका नामांकित वकीलामुळे घडले. आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुलाच्यावतीने निकाल दिला असला तरी प्रकरण संपलेले नाही. पुढे हे प्रकरण जिल्हा न्यायालयात जाईल, उच्च न्यायालयात जाई, सवोर्र्च्च न्यायालयात जाईल. प्रकरणाचा निकाल काहीही होईल. परंतू नांदेडचा मुलगा आणि बार्शीची मुलगी या दोन कुटूंबाच्या झालेल्या वाताहतीला एक वकील जबाबदार आहे. जगात वकीली हा एकच व्यवसाय असा आहे की, ज्याच्या नावापुढे नोबल असे विशेषण लावले जाते. मग नांदेडच्या वकीलाची नोबल्याटी कोठे गेली हा एक विद्यावाचस्पती मिळविण्यासाठीचा विषय होवू शकतो.
वंशपरंपरागत संपत्ती खाण्याचा प्रकार
ज्या वकीलाने या दोन कुटूंबामध्ये लावून आग शेकण्याचा प्रकार केला. त्याच्या घरातील एक प्रकरण आता बाहेर आले आहे. नांदेड शहरातून वाहणाऱ्या नदीपलिकडे असणाऱ्या एका सोसायटीमध्ये त्याच्या वडीलाचा मोठा भुखंड आहे. त्याच्या वकीलांचा मृत्यू झाला आहे. तरीही तो भुखंड त्यांच्याच नावावर आहे. मुळात ते तिन बंधू आहेत. त्यापैकी नंबर 2 च्या भावाला हा भुखंड द्यायचे ठरले होते. पण बापाच्या मृत्यूनंतर बापाच्या काही सेवकांच्या हाताने हा भुखंड गुपचूपपणे वकील खाऊन टाकण्याच्या तयारीत आहे. परंतू त्या संस्थेचे अध्यक्ष अत्यंत निर्मळ व्यक्ती आहेत. त्यांनी सांगितले की, वारसा प्रमाणपत्र आणल्याशिवाय मी या भुखंडाचे हस्तांतरण करणार नाही. पण आज निर्मळ मनाचे अध्यक्ष असल्याने ठिक झाले. पण पुढे नवीन निवडणुक झाली आणि नवीन खाऊ अध्यक्ष आला तर मात्र हा भुखंड आपल्या बंधूच्या हक्काचा असतांना हा वकील तो भुखंड नक्कीच खाऊन टाकणार असे दिसते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *