प्रभु श्री रामचंद्रजींचा जन्म मध्यान्ह काळात उल्लेखीत आहे. पण सकाळच्या सुर्योदयासोबतच आज आप-आपल्या दुचाकी, चार चाकी गाड्यांवर भगवे ध्वज, जय श्री राम लिहिलेले ध्वज लावून लोक फिरत होते. गोदावरी नदीच्या काठावरील नावघाट आणि नवीन पुल येथे असलेल्या राम मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी लोकांनी रिग लावली होती. लोहारगल्ली भागातील श्री साईमंदिर भागातून निघालेली पालखी जुना मोंढा भागात फिरून परत मंदिराकडे गेली.
सकाळी 10 वाजेच्यासुमारास महाविर चौकातील पंचवटी हनुमान मंदिरासमोरून एक मोटार सायकल रॅली निघाली. हजारोंच्या संख्येत महिला, पुरूष या रॅलीत सामिल झाले होते. जय श्री राम जय श्रीरामच्या घोषणा दुमदुमत होत्या. ही रॅली पुर्णा रोडवरील समर्थ मंदिरापर्यंत गेली.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यंाच्या नेतृत्वातील असंख्य पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह लोकसभेच्या निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात आलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी रस्त्यावर विविध ठिकाणी निघणाऱ्या मिरवणूकांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही यासाठी परिश्रम घेत होते. संतोष उर्फ कालू ओझा यांच्या श्री राम जन्मोत्सव मिरवणूकीत सामील होणारी वाहने बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस निरिक्षक शरद मरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पुर्णपणे तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र इतवारा पोलीसांना दिले.
नावघाट आणि नवीन पुल येथील राम मंदिरात दुपारी 12 वाजता भगवान श्री.रामचंद्रजींच्या जन्मोत्सवानिमित्त महाआरती झाली. राम मंदिर नवापुल येथे आरती झाल्यानंतर तेथून पालखीमध्ये रामजींची मिरवणूक गाडीपुरा मार्गे रेणुका माता मंदिरपर्यंत गेली आणि तेथून मुख्य मिरवणूक निघाली.श्री रामजन्मोत्सव अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे.
रेणुका माता मंदिर येथून निघालेल्या श्री रामचंद्रजींच्या यात्रेत युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. केसरी के लाल कर छोटा सा मेरा काम रामजी से कह देना मेरा जय सियाराम या भजनाने युवकांनी धरलेले ताल विस्मरणीय होते. या मिरवणूकीमध्ये ढोल ताशाच्या गजराने उत्साह वाढत होता. दरवर्षी रामजन्मोत्सवानिमित्त निघणारी प्रभु श्री.रामचंद्रजींची शोभा यात्रा त्यांचे भक्त हनुमानजी यांच्या अध्यक्षतेत सुरू होते. महाबली हनुमानजी आणि त्यांची वानर सेना या यात्रेत सर्वात समोर होती. स्वर तांडव ढोल ताशा पथकाच्या कलाकारांनी अत्यंत लयबध्द पध्दतीत ढोल आणि ताशे वाजवून या मिरवणूकीची शोभा वाढवली. संजीवनी भजन मंडळातील अनेक गायकांनी रामजी की सेना चली या भजनापासून सुरूवात करून वेगवेगळ्या भजनांना प्रस्तुत केले. यातील विकास परदेशी यांच्या आवाजाची आणि दर्शक आणि श्रोत्यांवर नियंत्रण करण्याची कला लईभारी होती.
सुरू झालेली भगवान श्री.रामचंद्रजींची शोभायात्रा हळुहळू पुढे सरकत होती.जय श्रीराम, महाबली हनुमान की जय हो, महाकाल की जय हो, भारत माता की जय अशा अनेक घोषणांनी शहर निनादले. यात्रा शिवाजीनगर भागात आल्यानंतर पोलीस प्रशासनाला भरपूर मेहनत करावी लागली आणि ही शोभा यात्रा हळुहळू पुढे जात गेली. यात्री 10 वाजता ही शोभा यात्रा समाप्त होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर या शोभा यात्रेची नोंदणी नाही. या शोभा यात्रेत सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती, महिला, पुरूष, युवक, बालके प्रभु श्री रामचंद्रजींच्या नावावरच जमली होती आणि ही यात्रा अत्यंत आनंद उत्साहात मागील 13 वर्षापुर्वी सुरू झाली होती आणि आज तिचे स्वरुप मोठे बृहद झाले आहे. या शोभा यात्रेसाठी तयार होणारी प्रभु श्री रामचंद्रजींची मुर्ती दरवर्षी नांदेड जिल्ह्यातील इतर ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा करणाऱ्या समितीला दिली जाते. प्रत्येक वर्षी नांदेडच्या मिरवणूकीत प्रभु श्री रामचंद्रजींची नवीन मुर्ती तयार केली जाते. या यात्रेला मागील 14 वर्षात आलेले महत्व दरवर्षी वाढतच आहे आणि वाढतच राहिल.
शोभायात्रेत सर्वात समोर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच प्रत्येक धर्मातील व्यक्तीला आपल्या धार्मिक विधी पार पाडण्याचा हक्क संविधानात मिळालेला आहे. त्यासोबतच शहिद उधमसिंघ यांच्या जीवनावरची कथा चित्रीत करण्यात आली होती. एका वाहनावर छोट्या युवती आपले शक्ती प्रदर्शन दाखवत होत्या. दहम्पातशाह श्री गुरू गोविंदसिंघजी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगवान झुलेलाल, विवेकानंदजी, वि.दा.सावरकर, महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महापुरूषांच्या चित्रांना सन्मानपुर्वक यात्रेत सहभागी करून घेण्यात आले होते. मिरवणूक रात्री उशीरा अशोक नगर भागातील भगवान मारोतीच्या मंदिरात समाप्त होईल. मिरवणूक पाहण्यासाठी जागो-जागी लोक इमारतींवर मिरवणूकींची वाट पाहत बसलेले आहेत. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, महाप्रसाद वितरीत केला जात आहे.