नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला एक मुलगा त्रास देवू लागला म्हणून दुसऱ्या एका 22 वर्षीय युवकाने त्या बालिकेचा त्रास वाचविल्यानंतर त्याच्याच फोनवरून कॉल करून 11 वर्ष 11 महिन्याच्या बालिकेला पळवून नेले. ती बालिका दीड महिन्यानंतर अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतली. आज पोक्सो न्यायालयाने 12 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला 4 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.24 फेबु्रवारी 2024 रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 11 वर्ष 11 महिने वय असलेल्या अल्पवयीन बालिकेस कोणी तरी पळवून नेल्याची तक्रार आली. त्या संदर्भाने पोलीस ठाणे अर्धापूर येथे गुन्हा क्रमांक 66/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या संदर्भाने अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सायबर विभागाची मदत घेवून काम सुरू ठेवले होते. दि.13 एप्रिल रोजी अर्धापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के, पोलीस अंमलदार संभाजी गौरकर, सतिश लहानकर आणि महिला पोलीस अंमलदार इंदु गवळी यांनी पळवून नेलेली बालिका आणि पळवून नेणारा युवक बालाजी कन्हैया परमार (22) यास आनंदनग परभणी येथून ताब्यात घेतले. बालिकेला परत आणल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार बालाजी परमारने तिच्यासोबल अनेक वेळेस अतिप्रसंग केला होता. म्हणून या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि पोक्सो कायद्याची वाढ झाली. बालाजी परमारने एका मुलाच्या त्रासापासून त्या बालिकेला वाचवतांना स्वत:च्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासोबत अतिप्रसंग केले. आज पोक्सो विशेष न्यायालयाने 12 वर्षीय बालिकेवर दीड महिने अत्याचार करणाऱ्या बालाजी परमारला चार दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे. अल्पवयीन बालिकेला पळवून नेणे आणि अत्याचार करणे अशा गंभीर गुन्ह्याला उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, नांदेड ग्रामीण उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन यांनी अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले आहे.