नांदेड(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सदभावना एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये विविध संघटनेचे, विद्यार्थी,धर्मगुरू सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी युवकांना सोशल मिडीयावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट करू नका असे आवाहन केले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आज सकाळी 8.30 वाजता सदभावना,एकता रॅलीची सुरूवात पोलीस अधिक्षक कार्यालयातून झाली. या रॅलीची सुरूवात हिरवी झेंडी दाखवून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केली. या रॅलीमध्ये पोलीस मित्र, वेगवेगळ्या शाळांचे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्यामध्ये आयुर्वेदीक कॉलेज, केंब्रीज विद्यालय, महात्मा फुले हायस्कुल, राजश्री शाहु विद्यालयातील एनसीसी कॅडेट, केंद्रीय विद्यालय, एम.एस.सी.आय.टी.,नादब्रम्ह विद्यालय, बहुउद्देशिय सेवाभावी नाट्य संस्था, राम मनोहर लोहिया कला पथक, पंचकृष्णी भजनी मंडळ सोमठाणा, पोलीस मुख्यालयातील अंमलदार, अनेक पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. या रॅलीची सांगता सकाळी 10.30 वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर झाली.
या रॅलीमध्ये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भाग घेतलेल्या सर्वांना संबोधीत करतांना सांगितले की, तरुणांनी जात, वंश, धर्म आणि भेद न करता सर्व भारतीय जनतेने भावनिक ऐक्य व सामाजिक सामंजस्य ठेवावे. आदर्श आचार संहितेचे पालन करून येणारे सर्व सन, उत्सव, एकोप्याने साजरे करावे असा संदेश दिला. व्हाटसऍप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह, धार्मिक, भावना दुखवणारे पोस्ट पोस्ट करू नये तसेच शेअर आणि फारवर्ड करू नये तसेच त्यावर टिपणी करू नये अन्यथा कार्यवाही करण्यात येईल.
सिख धर्म गुरू बाबा बलविंदरसिंघजी, बौध्द धर्म गुरू भदंत पय्याबोजी, मुस्लिम धर्म गुरू मौलाना नुरूल हसन, विश्र्व हिंदू परिषदेचे शशिकांत पाटील हजर होते. त्यांनी आपल्यावतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. नांदेडकरांना धार्मिक एकता टिकविण्याचे आवाहन करतांना पथनाट्यातून बहुउद्देशिय सेवा भावि संस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राम मनोहर लोहिया कला पथकाने आपल्या कलेतून ऐक्य कसे राखावे हे दाखवले. पंचकृष्णी भजनी मंडळ सोमठाणा यांनी भजनाच्या माध्यमातून एकता राखण्याचा संदेश देतांना विविध पोशाख धारण केले होते. आम्ही सर्व एक आहोत असे फलक सर्वांच्या हातात होते. ज्यातून एकता राखण्याचा संदेश देण्यात आला.
या सदभावना एकता रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मिनल करनवाल, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम., गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी नौशाद पठाण हे सहभागी झाले होते.