लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रसार माध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या प्रसारीत कराव्यात-अभिजित राऊत

नांदेड(प्रतिनिधी)-येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रसार माध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या प्रसारीत कराव्यात हे सांगतांना जिल्हाधिकारी तथा लोकसभा निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, मिडीया सर्टीफिकेशन, ऍन्ड मॉनिटरींग कमिटी (एमसीएमसी) या सर्व बाबींवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सांगितली.

एमसीएमसी समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, विकास माने, प्रफुल्ल कर्नेवार, डॉ.अशोक कदम, विश्र्वास वाघमारे, मिलिंद व्यवहारे, राजेश निस्ताने असे सदस्य आहेत.

लोकसभा निवडणुकांमध्ये प्रसारमाध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या प्रसारीत कराव्यात. या संदर्भाने प्रसार माध्यमांची काय जबाबदारी हे सविस्तरपणे समजून सांगतांना प्रविण टाके म्हणाले, पेड न्युज, जाहीरातील आणि लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा प्रसार करणाऱ्या बातम्या याबद्दल अत्यंत कडकपणे सर्व तपासणी होणार आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडावी. मोठ्या संख्येत पाठवले जाणारे एसएमएस, प्रसार, प्रचार करण्यासाठी तयार करण्यात येणारे हॅन्ड बिल, पॉम्पलेट याबाबत माहिती सांगतांना त्यातील चुका काय असू शकतात. याचे विवेचन केले. जाहीरातीचा मजकुर प्रमाणित करणे राजकीय पक्षांना अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी जाहीरात यावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. एकच बातमी पेड न्युजच्या माध्यमाने प्रसारीत करण्यात येत असले तर त्यावर कार्यवाही होईल. एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणारी बातमी छापल्यानंतर विरोधक उमेदवारांच्या बातम्या छापल्या नाहीत तर ते सुध्दा चुकीचे आहे. म्हणजे एकाच उमेदवारांच्या बातम्यांना पेड न्युज समजले जाईल. याबाबतची जबाबदारी सांभाळण्यासाठी एमसीएमसी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार माध्यमांसाठीचा माध्यम कक्ष 24 तास सुरू राहणार आहे. कोणताही नागरीक, राजकीय पक्षातील प्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी बातम्यांबद्दल, जाहिरातींबद्दल तक्रार करू शकतात.

निवडणुकीच्या दिवशी मतदान कक्षात जाता येणार नाही. दरवाज्यातून किंवा खिडकीतून त्या ठिकाणचे छायाचित्र आणि चल चित्रीकरण करता येईल. या ठिकाणी कॅमेरे हवे आहेत. मोबाईलने शुटींग व फोटो काढता येणार नाहीत. मतदानाच्या दिवशी सुध्दा माध्यम कक्ष असेल तेथेच पत्रकारांना प्रवेश असेल. बाकी इतर सर्व बाबी माध्यम कक्षाकडून दिल्या जातील.

लोकसभा निवडणुका पार पाडतांना पत्रकारांनी आपली भुमिका अत्यंत स्पष्ट ठेवावी. जेणे करून भारतीय प्रगल्भ लोकशाहीला पुढे नेण्यासाठी त्याची मदत होईल. प्रसार माध्यमांमुळे जनतेमध्ये जाणारे संदेश हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. त्यासाठी प्रत्येक प्रसार माध्यमातील व्यक्तीने अत्यंत बारकाईने विचार करूनच बातम्यांना प्रसिध्दी देणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *