आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

माध्यमांसंदर्भातील एमसीएमसी समितीची बैठक

नांदेड,(जिमाका)- लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. माध्यमांनी विशेषतः समाज माध्यमांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. आचारसंहिता लागताच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रसिद्धी साहित्याला संबंधित यंत्रणांनी काढून टाकावे, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

सोशल माध्यमांवर काम करणाऱ्या तरुणांनी आपल्या एखाद्या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग होऊन गंभीर कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याचा विचार करावा. तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्व माध्यम प्रतिनिधींनी, सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, हे लक्षात घेऊन प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामध्ये व्यक्त व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची जिल्हा दरसूची निश्चितीबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, माध्यम समिती व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य उपविभागीय अधिकारी विकास माने, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, गंगाप्रसाद दळवी, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलींद व्यवहारे, ज्येष्ठ पत्रकार राजेश निस्ताने, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, तसेच माध्यम समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आचार संहितेच्या काळात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज याबाबत सादरीकरण केले. तसेच या समितीमार्फत करण्यात येणाऱ्या कामकाजाची विस्तृत माहिती सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *