आरक्षण आंदोलनात झालेल्या हिंसक घटनांची चौकशी भापोसे संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेत एसआयटी करणार

नांदेड(प्रतिनिधी)-नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनाबाबतची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आली आहे. हा शासन निर्णय गृहविभागाने निर्गमित केला असून उपसचिव राजेश गोविल यांची त्यावर डिजिटल स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र विधानसभेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये हिंसक घटना घडल्या. या बाबतचा तपास व्हावा म्हणून या एसआयटीचे गठन करण्यात आले आहे.मुख्यमंत्र्यांनी या एसआयटीला मान्यता दिली आहे.
या विशेष तपास पथकाने चौकशी करतांना राज्यात आरक्षण विषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरू असतांना आंदोलनांचा गैरफायदा घेवून सामाजिक सलोखा, वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकीसारख्या हिंसक घटना जाणिवपुर्वक घडविल्या. तसेच सोशल मिडीया आणि मिडीयाचा गैरवापर करून चुकीची माहिती देवून, त्याद्वारे दंगे भडकविण्याचा प्रयत्न केला. एसआयटीने या सर्व बाबींचा तपास करून तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा एसआयटी स्थापनेचा आदेश संकेतांक क्रमांक 202403111634414129 नुसार प्रसिध्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *