नांदेड (प्रतिनिधि)-आजची स्त्री ही एक रोल मॉडेल आहे, ती शिक्षण घेते, संशोधन करते, नोकरी करते, घर चालविते, स्वयंपाक करते, मुलांना घडविते, सासू-सासऱ्यांचा सांभाळ करते, नवऱ्याची मर्जी राखते इ, तीच स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विमान चालविते, युद्धासाठीही तयार असते, प्रशासनातही अधिकार गाजविते आणि राजकारणातही अनेक जबाबदाऱ्या पेलते अशी ही आजची महिला म्हणजे समाजाचे रोल मॉडल आहे. त्यामुळे निश्चितच पुरुषापेक्षा महिलांवर जास्त जबाबदारी असते, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते दि. ६ मार्च रोजी विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्रामार्फत आयोजित विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यान प्रसंगी अध्यक्षीय मनोगत मांडत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्रा. डॉ. प्रतिभा देसाई, व्यवस्थापन परिषद सदस्य हनमंत कंधारकर, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका डॉ. शालिनी कदम यांची उपस्थिती होती.
पुढे कुलगुरू डॉ.चासकर म्हणाले की, जागतिक महिला दिनानिमित्त एखादा दिवस किंवा एखादा आठवडा महिलांवर कार्यक्रम घेऊन न थांबता विद्यापीठामध्ये सतत महिला सक्षमीकरणासाठी स्त्री अध्ययन केंद्रामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. महिला या सर्वच आघाडीवर पुढे आहेत. येणाऱ्या काळात महिलांच्या कुठल्याही सूचनांचे आदर करून त्यांचे पालन करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. प्रतिभा देसाई आपल्या व्याख्यानात म्हणाल्या की, महिलांना पूर्णपणे सक्षम करण्यासाठी आपल्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे. गेल्या दशकामध्ये महिलांच्या विचारसरणीत अमुलाग्र असे बदल झाले आहेत. त्यामध्ये त्यांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आहे. २०११ मध्ये ८२ टक्के पुरुष साक्षर होते. तेव्हा महिलांचे ६५ टक्के एवढे प्रमाण होते. तेच २०२२ मध्ये पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण ८४ टक्के इतके झाले तर महिलांचे ७२ टक्के साक्षरतेचे प्रमाण झाले आहे. म्हणजेच गेल्या दहा वर्षात पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण हे २ टक्के तर महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ७ टक्के एवढे वाढले आहे. महिला सक्षमीकरण व स्त्री-पुरुष यांची समानता सर्वच स्तरावर झाली पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्रातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि.६ ते ९ मार्च या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दि. ६ मार्च रोजी प्रा. डॉ. प्रतिभा देसाई यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. दि. ७ मार्च रोजी विद्यापीठ परिसरातील सर्वच विद्यार्थिनी व महिलांसाठी स्त्री-रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.८ मार्च रोजी दुरदृश्यप्रणालीद्वारे (ऑनलाईन) प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. दि. ९ मार्च रोजी हिंदी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. असे स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका डॉ. शालिनी कदम यांनी कळविले आहे.
या प्रसंगी समाजशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. एन.बी. बोधगिरे, प्रा. डॉ. पी.पी. लोणारकर, प्रा. डॉ. बी.एस. जाधव यांच्यासह विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गजानन इंगोले यांनी केले.