नांदेड(प्रतिनिधी)-फिर्याद लिहितांना सार्वजनिकरित्या फिर्यादीची जात लिहिली जाते. परंतू भाग्यनगर पोलीसांनी एका शिक्षिकेच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणातील आरोपींविरुध्द ऍट्रॉसिटीची कलमे जोडली नाहीत. म्हणून फिर्यादी महिलेने ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यासाठी नवीन अर्ज विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधिक्षक आणि पोलीस निरिक्षक भाग्यनगर यांना दिला आहे.
पोलीस ठाण्यात सर्वसामान्यपणे एखादा फिर्यादी गेल्यानंतर त्याची फिर्याद घेतांना त्या व्यक्तीची जात फिर्यादीमध्ये उल्लेखीत केली जाते. दि.5 फेबु्रवारी रोजी किर्ती रघुनाथ ताटे या शिक्षीकेने भुखंड घेण्याच्या कारणावरून डॉ.प्रमोद अन्सापुरे, डॉ.वैशाली अन्सापुरे, नागमणी अन्सापुरे, शंकर अन्सापुरे यांनी माझ्या पतीला त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केले असा अर्ज दिला होता. ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षापेक्षा जास्तची शिक्षा आहे. अशा गुन्ह्यांमध्ये ऍट्रॉसिटी कायदा आपोआप जोडला जातो. परंतू भाग्यनगर पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा क्रमांक 38/2024 मध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 306, 504 आणि 34 जोडली. परंतू ऍट्रॉसिटी कायदा जोडला नाही. त्या फिर्यादीमध्ये शिक्षीका किर्ती ताटे यांची जात लिहिली होती की नाही याची माहिती मिळू शकली नाही. परंतू नंतर त्यांनी विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आणि पोलीस निरिक्षक भाग्यनगर यांना अर्ज देवून आम्ही अनुसूचित जातीचे व्यक्ती आहोत त्यामुळे गुन्हा क्रमांक 38/2024 मध्ये ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यात यावा अशी मागणी केली आहे. हा अर्ज किर्ती ताटे यांनी 20 फेबु्रवारी रोजी दिला आहे. तरी पण आज 28 फेबु्रवारीपर्यंत तरी गुन्हा क्रमांक 38 मध्ये भाग्यनगर पोलीसांनी ऍट्रॉसिटी कायदा जोडलेला नाही अशी माहिती किर्ती ताटे यांनी वास्तव न्युज लाईव्हला दिली.