जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा घेणार मासिक आढावा; तक्रारी मांडण्यासाठी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत वेळ राखीव

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप हे सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी नांदेड येथे येणार आहेत. यानिमित्ताने ते पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी विशेष वेळ राखीव ठेवला आहे. नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या पोलीसविषयक तक्रारी, समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत ते नागरिकांच्या भेटी घेणार आहेत.

पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केलेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही होत नसल्यास, तक्रारींच्या निवारणास विलंब होत असल्यास किंवा पोलीस प्रशासनाशी संबंधित अन्य काही अडचणी असल्यास नागरिकांना या भेटीदरम्यान आपली बाजू थेट पोलीस उपमहानिरीक्षकांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्या मांडण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.नागरिकांनी सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद वाढविणे, नागरिकांच्या तक्रारी वरिष्ठ स्तरावर ऐकून घेणे तसेच संबंधित समस्यांच्या निवारणासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!