१३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त; खबर हेल्पलाइनवर माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका आणि जुगार व्यवसायाविरोधात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. अहमदपूर आणि चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून २३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी आणि चारचाकी वाहनासह एकूण १३ लाख ४२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लातूर जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. शिरूर ताजबंद येथे मटका बुकीवर छापा अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरूर ताजबंद येथील मुखेड रोडवरील आरमान हॉटेलमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून ५ हजार ६२० रुपये रोख आणि ३८ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल, असा एकूण ४३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात सात जणांविरुद्ध कारवाई करून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८५/२०२६, महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नळेगाव शिवारात तिर्रट जुगारावर कारवाई दुसरी कारवाई चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नळेगाव शिवारात करण्यात आली. येथील रॉयल बारच्या वरच्या मजल्यावर तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने छापा टाकून ८८ हजार ५२० रुपये रोख, १५ मोबाईल, चार मोटारसायकली आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १२ लाख ९८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात १६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४४/२०२६, महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही कारवायांत मिळून ९४ हजार १४० रुपये रोख, २१ मोबाईल, चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. अवैध जुगार व्यवसायाविरोधातील या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले. अवैध धंद्यांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी अवैध धंद्यांबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 5 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महायुद्धाचा भडका? हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचे अमेरिकन विमानांवर क्षेपणास्त्र हल्ले; झिरो अवर घोषित!