फळविक्रेते ताब्यात, वाहतूक शाखेचे फोटोसेशन! मुंडे साहेबांचा पत्रकार ग्रुपवर कारवाई रिपोर्ट

वजीराबादमध्ये फळगाड्यांवर कारवाई; पावतीधारक विक्रेत्यांना ताब्यात घेऊन फोटोसेशन! मुंडे साहेबांचा रिपोर्ट पत्रकारांच्या ग्रुपवर, मग पोलीस अधीक्षकांना कळवायचे कशाला?

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाहतूक शाखेने वजीराबाद परिसरात कलामंदिर जवळ रस्त्यावर फळविक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांवर केलेली कारवाई आता चर्चेचा विषय ठरली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी असली, तरी कारवाईची पद्धत, अधिकारांची मर्यादा आणि त्यानंतर केलेले फोटोसेशन यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित फळविक्रेते दररोज महानगरपालिकेची तै बाजार रक्कम भरून पावती घेत असल्याचा दावा केला जात आहे. मग पालिकेची पावती घेऊन रस्त्यावर फळविक्री करणाऱ्या या विक्रेत्यांना अचानक वाहतूक शाखेने ताब्यात घेतले कशाच्या आधारे? म्हणजे हे ईललीगल डिटेन्शन नव्हे काय ? महानगरपालिका एका बाजूला शुल्क वसूल करते आणि दुसऱ्या बाजूला वाहतूक शाखा कारवाई करते, तर या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा दिवा नेमका कुठे विझला?

कारवाई की फोटोसेशन?

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी संबंधित फळविक्रेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढले आहेत. फळांनी भरलेल्या गाड्या आणि जमिनीवर बसवलेले विक्रेते या छायाचित्रातून एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी पकडल्याचा आभास निर्माण होतो. गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे चेहरेही अनेकदा झाकले जातात; मात्र रोज फळे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचे चेहरे उघडे ठेवून फोटो काढण्याची गरज नेमकी काय होती? वाहतूक नियमांची अंमलबजावणी करायची होती की कारवाईचा व्हिज्युअल रिपोर्ट तयार करायचा होता?

पोलीस अधीक्षकांना रिपोर्ट की पत्रकारांच्या ग्रुपवर?

या कारवाईचा फोटो आणि व्हिडिओ क्राईम रिपोर्टर नावाच्या पत्रकारांच्या ग्रुपवर सायंकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी अपलोड करून कारवाईचा रिपोर्ट दिल्याचे सांगितले जात आहे. प्रश्न असा की, पोलीस निरीक्षकांनी आपल्या वरिष्ठांना कारवाईची माहिती देण्यासाठी अधिकृत यंत्रणा आहेच; मग पत्रकारांच्या ग्रुपवर कारवाईचा व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवण्याची एवढी घाई कशासाठी? पोलीस अधीक्षकांना रिपोर्ट देण्यापेक्षा पत्रकारांच्या ग्रुपवर रिपोर्ट देणे अधिक महत्त्वाचे झाले आहे काय?

वाहतूक शाखेला डिटेंशनचा अधिकार किती?

वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई, वाहनावरील कायदेशीर कार्यवाही किंवा आवश्यकतेनुसार संबंधित पोलीस ठाण्याकडे प्रकरण सुपूर्द करणे, अशा प्रक्रियांचा अवलंब केला जातो. मात्र फळविक्रेत्यांना आणि त्यांच्या गाड्यांना ताब्यात ठेवण्याची नेमकी कायदेशीर तरतूद कोणती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वाहतूक शाखेने केलेली कारवाई कोणत्या कलमानुसार करण्यात आली? संबंधित विक्रेत्यांना कोणती नोटीस किंवा पावती देण्यात आली? वाहन ताब्यात घेतले असल्यास त्याची अधिकृत नोंद कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरे वाहतूक शाखेने देणे आवश्यक आहे. कारवाई कायदेशीर असेल तर तिचे समर्थन कागदपत्रांनी व्हायला हवे; पत्रकारांच्या ग्रुपवरील व्हिडिओने नव्हे!

हातगाडीवाल्यांकडून ‘मोदक’ कोण गोळा करतो?

काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात हातगाडीवाल्यांकडून वाहतूक शाखेतील काही कर्मचाऱ्यांकडून दोन ते अडीच मोदक मागितले जात असल्याचा आरोप प्रसिद्ध झाला होता. आधी एक मोदक, आता दोन-अडीच मोदक, असा हा कथित दरवाढीचा प्रवास नेमका कुठे पोहोचला? त्या बातमीची चौकशी झाली का? संबंधित कर्मचाऱ्यांवर काही कारवाई झाली का? जर आरोप निराधार असतील, तर त्यांचे खंडन करावे. आणि आरोप गंभीर असतील, तर चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. अन्यथा मोदक कोणाच्या ताटात जातात, हा प्रश्न कायम राहणारच!

जुना मोंढा, नवीन मोंढा आणि पहाटेची ड्युटी!

वाहतूक शाखेचे काही कर्मचारी सकाळी सहा-सात वाजताच जुना मोंढा आणि नवीन मोंढा परिसरात नेमके कोणते काम करतात, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. बाहेर जिल्ह्यातून आणि बाहेर राज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते का? वाहतूक शाखेची नियमित ड्युटी सकाळी आठ वाजल्यानंतर सुरू होत असल्यास, त्यापूर्वीच्या उपस्थितीचा अधिकृत लेखाजोखा काय? वाघी, अर्धापूर, उमरी, विष्णुपुरी आदी मार्गांवर धावणाऱ्या ऑटोचा हिशोब कोण ठेवतो? छोटे हत्ती वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेवर कोणाचे नियंत्रण आहे? एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक कर्मचारी तैनात असताना शहरातील वाहतूक कोंडी कमी का होत नाही?

दिवाळीचे चकली-लाडू-बर्फी कुठे गेले?

दिवाळीच्या काळात जमा झालेल्या चकल्या, लाडू आणि बर्फी यांची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. या वस्तू कोणी जमा केल्या, कुठे ठेवल्या आणि त्यांचा हिशोब काय? हा प्रश्नही वाहतूक शाखेने स्पष्ट करावा, अशी मागणी होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे वाहतूक शाखेचे मुख्य काम आहे. पण फळगाड्यांवर कारवाई करताना नियमांची अंमलबजावणी जितकी काटेकोर असावी, तितकीच कारवाईची पारदर्शकता आणि अधिकारांची मर्यादा स्पष्ट असणेही आवश्यक आहे.

फळविक्रेत्यांच्या गाड्या ताब्यात घेऊन फोटो काढणे सोपे असेल; मात्र वाहतूक शाखेच्या कामकाजाचा हिशोब देणेही तितकेच आवश्यक आहे.

आता प्रश्न फळविक्रेत्यांचा नाही, तर कारवाईच्या पद्धतीचा, अधिकारांचा आणि कथित मोदक संस्कृतीचा आहे. वाहतूक शाखा या प्रश्नांना अधिकृत उत्तर देणार की पुन्हा एखादा फोटो पत्रकारांच्या ग्रुपवर टाकून कारवाई सुरू आहे असा रिपोर्ट देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फळ विक्रेत्यांचे गाडे ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ ….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!