नांदेड (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नांदेडमध्ये जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांना महान घटनातज्ज्ञ, समाजसुधारक आणि देशातील आरक्षण धोरणाचा अभ्यासक समजून मराठा समाजाने नेतृत्व स्वीकारले आहे, असा उपरोधिक टोला लगावत हाके यांनी ओबीसी आरक्षण, सामाजिक प्रतिनिधित्व आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. दरम्यान, महाराष्ट्रासमोर सध्या सर्वांत गंभीर प्रश्न दुष्काळाचा असून, शेतकऱ्यांना केवळ आर्थिक पॅकेज देण्यापेक्षा पुढील आठ महिन्यांत पशुधन कसे वाचवायचे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. २५ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकरी जगला तर अन्नसाखळी टिकेल आणि पशुधन वाचले तर दूध उत्पादनाची व्यवस्था टिकेल. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करून प्रश्न सुटणार नाही. आगामी चार ते आठ महिन्यांत चारा पिकांची लागवड, पशुधनासाठी पाणी आणि चारा उपलब्धता यासाठी स्वतंत्र योजना राबविणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पशुधनासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न वेगवेगळा हाताळला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करताना खासगी सावकार, बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट अरेरावी व गुंडगिरीची भाषा वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा वसुली एजंटांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. केवळ घोषणा न करता कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी सरकारने प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, हे म्हणणे चुकीचे! ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना हाके म्हणाले की, ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून पंचायत समिती सभापती आणि पोलीस पाटील पदांपर्यंत ओबीसींच्या हक्काच्या जागांवर मराठा-कुणबी समाजातील उमेदवार दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी आरक्षण संपले आहे, असे सांगताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. कुणबी प्रमाणपत्रांची वैधता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके म्हणाले, जरांगे पाटील हे ११२ देशांतील आरक्षण धोरणांचा अभ्यास करून आलेले महान घटनातज्ज्ञ असल्याप्रमाणे त्यांना स्वीकारले जात आहे. त्यांच्या आंदोलनामागे मोठे कारखानदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबीसी समाजाकडे संघटनशक्ती आणि आर्थिक पाठबळ नसल्याने त्याला आपले राजकीय हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे ते म्हणाले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ६,८४७ कोटींचा प्रस्ताव ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमधून मिळालेल्या प्रवेशानंतर शिष्यवृत्ती नाकारली जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. यासंदर्भात शासनाचे सहा शासन निर्णय दाखवून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रस्तावाला ओबीसी मंत्र्यांनी सहमती दर्शविली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ओबीसींच्या विविध योजनांसाठी ६ हजार ८४७ कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला कांशीरामांसारख्या नेतृत्वाची गरज ओबीसी समाजाला राजकीय दिशा देण्यासाठी कांशीराम यांच्यासारख्या समर्पित नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत हाके म्हणाले की, आजपासून संघटनात्मक काम सुरू झाले तर २०५० नंतर ओबीसी समाजाला न्याय मिळण्याची परिस्थिती निर्माण होईल. समाजाने मतांचा बाजार मांडण्याऐवजी आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांची मते पैशांसाठी विकली जात असल्याचा आरोप करत त्यांनी मतदारांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली. एका बाजूला कारखानदारी आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन, ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनावर प्रश्न उपस्थित करत ऊस उत्पादकांना योग्य दर मिळण्यासाठी साखर कारखान्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे आव्हान दिले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना महाराष्ट्रात दुय्यम स्थान मिळत असल्याची खंत व्यक्त करत, एससी, एसटी, ओबीसी आणि भटक्या-विमुक्त समाजाला निर्णय प्रक्रियेत सन्मानाचे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी मांडली. Kanthak Suryatal Post Views: 86 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संविधान दिनानिमित्त नांदेडमध्ये 26 नोव्हेंबरला भव्य संविधान रॅली