नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) दुपारी आयईडी (IED) बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा केला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सुमारे दोन तास कसून तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक आढळून आले नाही. त्यानंतर दुपारी ४.२५ वाजता न्यायालयाचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, नांदेड जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दुपारच्या सुमारास अज्ञात ई-मेल आयडीवरून न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली होती. जिल्हा न्यायालय प्रशासनाने हा ई-मेल पुढील तातडीच्या कार्यवाहीसाठी पोलिसांकडे पाठविला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार, दहशतवादविरोधी शाखेचे (ATB) पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे तसेच दहशतवादविरोधी पथकाने तातडीने न्यायालयात धाव घेतली. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (PDJ) यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार पीए सिस्टीमद्वारे घोषणा करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील पक्षकार, वकील, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक मिना तोटेवार, जलद प्रतिसाद पथकाचे मारोती चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण न्यायालय परिसराची घातपातविरोधी तपासणी केली. न्यायालयाची मुख्य इमारत तसेच आतील आणि बाहेरील संपूर्ण परिसराची बारकाईने झाडाझडती घेण्यात आली. सुमारे दोन तास चाललेल्या या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नसल्याचे बीडीडीएस पथकाने स्पष्ट केले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणि न्यायालय परिसर सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने दुपारी ४.२५ वाजता न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यानंतर पक्षकार व नागरिकांना न्यायालयात प्रवेश देण्यात आला. दरम्यान, धमकीचा ई-मेल पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध तसेच ई-मेलच्या स्रोताचा तांत्रिक तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिक, वकील आणि पत्रकारांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आणि सतर्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Kanthak Suryatal Post Views: 112 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्नीची हत्या करणार्या नवर्याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्या केली