नांदेड (प्रतिनिधी)  – नांदेड शहरातील हिंगोली गेट जवळील केएफ एंटरप्रायझेस फायनान्स कंपनीच्या कार्यालयात माळकौठा, तालुका मुदखेड येथील ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा मृतदेह आढळल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणाच्या सखोल व निष्पक्ष तपासासाठी नांदेड पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत केले असून, आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्याद व घटनाक्रम

मृत शेतकऱ्याच्या ३७ वर्षीय पत्नी श्रीमती ज्योती चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास माळकौठा गावातील मारोती मंदिराजवळून दोन जणांनी चंद्रकांत शिंदे यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नांदेड येथील केएफ एंटरप्रायझेस फायनान्स कार्यालयात आणले. तेथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवले आणि बेदम मारहाण केली. या प्रकरणी विजराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १४०(१), १४०(२), १४२, १२७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

स्थानिक गुन्हे शाखा व विजराबाद पोलिसांनी कारवाई करत खालील आरोपींना अटक केली आहे:

  1. जयकुमार उर्फ भय्या भगवान गायकवाड – वय २२ वर्षे, रा. गोपाळचावडी, सिडको, नांदेड (अटक २५ ऑक्टोबर २०२६)
  2. शेख आमेर शेख साहेब – वय २५ वर्षे, रा. खुदबे नगर चौरस्ता, देगलूर नाका, नांदेड (अटक २५ ऑक्टोबर २०२६)
  3. इम्रान खान शाहेबाज खान – वय ४० वर्षे, रा. बुरहाण नगर, गोवर्धन घाट, नांदेड (अटक २५ ऑक्टोबर २०२६)
  4. शेख मुदस्सीर शेख खदीर – वय २४ वर्षे, व्यवसाय कॅशियर, रा. अर्धापूर, सध्या रा. पिरबुऱ्हाण नगर, नांदेड (अटक २६ ऑक्टोबर २०२६)

सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशेष तपास पथक

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

  • तपास अधिकारी: रामेश्वर वजने – उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर
  • मार्गदर्शक अधिकारी: सुरज गुरव – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड
  • पथकाची रचना: या पथकात ३ पोलीस अधिकारी आणि ६ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

कर्जवसुली किंवा फायनान्स कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर त्रास, धमकी अथवा दबाव येत असल्यास शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी घाबरून किंवा भावनेच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कळवावे.

विशेष बाब म्हणजे या केएफ कंपनीचे उदघाटन माजी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी १ नोव्हेंबर २०२५ रोजी केले होते. अशी निमंत्रण पत्रिका प्राप्त झाली आहे.त्यात केएफ चे अध्यक्ष स.  हरप्रीतसिंघ नरेंद्रसिंघ मेजर (मंटू) असे लिहिलेले आहे. इतर निमंत्रितांमध्ये सचिव  स.सतपालसिंघ किशनसिंघ खालसा (केरोसिनवाले) आणि उपाध्यक्ष  श्री श्रीनिवास जुगलकिशोर पांडे (शिरू) यांची नावे मुद्रित केलेली आहेत. या केएफ चे संपूर्ण नाव निमंत्रण पत्रिकेवर कुबेरफल  नागरी पतसंस्था मर्यादित नांदेड असे नमूद आहे. या कुबेर फल संस्थेचे कार्यालय ९२/९३ दुकान क्रमांक ७ कृषी उत्पन्न बाजार समिती बिट हॉल च्या बाजूला नवा मोंढा नांदेड असे मुद्रित केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!