शैक्षणिक संधी, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर होणार चर्चा; वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजन नांदेड (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील तरुणांशी संवाद साधण्यासाठी जय भीम Gen Z या विशेष टाऊनहॉल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथील शंकरराव सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत. नव्या पिढीतील तरुणांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, शैक्षणिक संधी, रोजगाराच्या समस्या आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विविध विषयांवर या संवादातून चर्चा होणार आहे.आजच्या बदलत्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीत तरुणांसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांना समजून घेणे, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विशेषतः बहुजन समाजातील तरुणांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी तसेच त्यांच्यासमोरील अडचणी यांवर या कार्यक्रमात विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे. जय भीम Gen Z हा उपक्रम नव्या पिढीला सामाजिक चळवळीशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तरुणांनी आपल्या समस्या, विचार आणि अपेक्षा मोकळेपणाने मांडाव्यात, तसेच सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी या टाऊनहॉलचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्येही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नांदेड आणि परिसरातील विद्यार्थी, युवक-युवती तसेच बहुजन समाजातील तरुणांनी उपस्थित राहून संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी, नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 131 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कृष्णा उमरीकर यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर;शिर्डी येथे ३ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा