अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात मोठा आणि धोकादायक मानला जाणारा इराण युद्धाचा निर्णय आता खुद्द रिपब्लिकन पक्षाच्याच मुळावर उठल्याचे चित्र समोर येत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध पुकारलेले युद्ध म्हणजे अमेरिकेच्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात हा निर्णय रिपब्लिकन पक्षासाठी अंतर्गत विघटनाचे आणि राजकीय विनाशाचे कारण ठरत आहे. ट्रम्प यांच्या युद्धखोर धोरणामुळे रिपब्लिकन पक्षात आता असंतोष छुप राहिलेला नाही; पक्षाचे बडे देणगीदार आणि वजनदार नेते ट्रम्प यांच्या धोरणावर उघडपणे ताशेरे ओढू लागले आहेत.

पीटर थिल यांचा थेट प्रहार अन् पक्षांतर्गत बंडखोरी

रिपब्लिकन पक्षातील या अंतर्गत उद्रेकाचा सर्वात मोठा आणि धक्कादायक पुरावा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि प्रभावी देणगीदार पीटर थिल यांनी उघडपणे घेतलेली विरोधी भूमिका होय. पेपलचे सह-संस्थापक, फेसबुकचे सुरुवातीचे गुंतवणूकदार आणि स्पेस-एक्स मधील भागधारक असलेल्या अब्जाधीश पीटर थिल यांनी ओहायोच्या सिनेट निवडणुकीत जे. डी. व्हॅन्स यांच्या सुपर पॅकला १५ दशलक्ष डॉलर्सची भरघोस देणगी दिली होती. पक्षातील अत्यंत वजनदार मानल्या जाणाऱ्या याच पीटर थिल यांच्या खाजगी कार्यक्रमातील संभाषणाची एक ऑडिओ टेप पॉलिटिकोने जाहीर केली आहे.

या लीक झालेल्या ऑडिओ टेपमध्ये पीटर थिल अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हणाले आहेत, मी या युद्धाबाबत अत्यंत साशंक आहे. आपण हे युद्ध करायला नको होते, यामध्ये अनेक मोठ्या चुका झाल्या आहेत. ट्रम्प यांच्या अत्यंत जवळच्या अब्जाधीश देणगीदारानेच इराण युद्धाला मोठी चूक ठरवल्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, ट्रम्प मात्र आपल्याच धुंदीत या युद्धाचे समर्थन करत आहेत. ट्रम्प यांच्या मते, इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे ही आपण केलेली सर्वात महान गोष्ट आहे; आजवर कोणत्याही अध्यक्षाने दाखवले नाही असे धैर्य आपण दाखवले आहे, अन्यथा इराणने आतापर्यंत महाभयंकर अण्वस्त्रांचा वापर केला असता. ट्रम्प यांच्या या आत्मप्रौढी आणि वास्तविक परिस्थितीतील या प्रचंड तफावतीमुळेच पक्षांतर्गत असंतोष अधिकच उफाळून आला आहे. फक्त पीटर थिलच नव्हे, तर राष्ट्रीय बुद्धिमत्ता संचालक तुल्सी गबार्ड यांच्यासह अनेक रिपब्लिकन नेत्यांच्या मनात या युद्धाबद्दल तीव्र शंका आणि भीती आहे. परंतु, ट्रम्प यांच्याविरोधात उघडपणे बोलण्याची हिंमत नसल्यामुळे अनेक नेते खाजगीतच आपला राग व्यक्त करत आहेत. ट्रम्प यांच्या व्यतिरिक्त या युद्धाचे उघड समर्थन करणारा एकही नेता पक्षात उरलेला नाही, हेच आजचे कडू सत्य आहे.

सामान्यांची होरपळ, महागाई अन् मध्यावधी निवडणुकांचे धर्मसंकट

इराणमधील युद्धाचा फटका केवळ मध्यपूर्वेतील रणधुमाळीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा थेट परिणाम अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या खिशावर होत आहे. अमेरिकेतील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर लावलेल्या बिलबोर्ड्सवर पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती दिसत असून महागाईचा प्रचंड भडका उडाला आहे. सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडल्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

या आर्थिक समस्येमुळे येणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कॅन्ससचे रिपब्लिकन सिनेट सदस्य रोजन मार्शल यांना जेव्हा इराण युद्धाबाबत पत्रकारांनी थेट सवाल केला, तेव्हा त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करण्याचे उघडपणे टाळले. मला हे युद्ध लवकरात लवकर संपलेले हवे आहे; आयझेनहॉवरप्रमाणेच मलाही युद्धाचा तिरस्कार आहे, असे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. ट्रम्प यांच्याशी थेट वैर पत्करण्याची हिंमत नसलेले रिपब्लिकन नेते आता युद्धावर बोलणेच टाळत आहेत.

मध्यावधी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला दोन गोष्टींवर अवलंबून राहावे लागत आहे: पहिले म्हणजे निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित करणे आणि दुसरे म्हणजे ट्रम्प यांना प्रचारसभेत उतरवून त्यांचा पारंपरिक मतदार वर्ग बाहेर आणणे. ट्रम्प यांचा मतदार वर्ग साधारणपणे दर चार वर्षांनी म्हणजेच ट्रम्प स्वतः बॅलट पेपरवर असतात तेव्हाच मोठ्या संख्येने बाहेर पडतो. मात्र, आजच्या घडीला महागाई आणि इंधन दरवाढीमुळे स्थानिक मुद्दे थेट जागतिक परराष्ट्र धोरणाशी जोडले गेले आहेत, ज्यामुळे रिपब्लिकन पक्षाची निवडणूक रणनीती पार कोलमडून पडली आहे.

अमेरिकन सैनिकांचे बळी अन् हुकूमशहांचे लाड

इराण युद्धाचे सर्वात भयानक आणि संतापजनक वास्तव म्हणजे या युद्धात अमेरिकन सैनिकांना द्यावी लागणारी प्राणांची आहुती होय. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या आणि सिनेटमधील अहवालानुसार, रशिया आणि चीन हे दोन्ही प्रतिस्पर्धी देश इराणला गुप्तपणे मदत करत आहेत. मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांना अचूक लक्ष्य करण्यासाठी रशिया आणि चीन इराणला गुप्त माहिती आणि रसद पुरवत आहेत. यामुळे अमेरिकेच्या लष्करी तळांचे प्रचंड नुकसान होत असून अनेक अमेरिकन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

इतकी गंभीर आणि घातक परिस्थिती असतानाही, अध्यक्ष ट्रम्प मात्र रशिया आणि चीनच्या या धोकादायक भूमिकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी बोलताना रशिया आणि चीनची मदत अत्यंत खालच्या पातळीवर असावी असा दावा करत स्वतःच्याच प्रशासनाच्या अहवालांना दुजोरा देणे टाळत आहेत.

ट्रम्प यांची ही भूमिका अत्यंत लाजीरवाणी आणि आक्षेपार्ह आहे. एका बाजूला ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये रेड कार्पेट अंथरून शाही स्नेहभोजन दिले, तर दुसऱ्या बाजूला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मियामी येथील डोराल कंट्री क्लबमध्ये जी-२० परिषदेसाठी निमंत्रित केले. रशिया आणि चीन अमेरिकन सैनिकांच्या हत्येत इराणला सहकार्य करत असताना, ट्रम्प मात्र पुतिन आणि शी जिनपिंग यांच्याशी मैत्रीचे नाटक करत आहेत. जेव्हा ट्रम्प यांना रशियाच्या मदतीबद्दल विचारले गेले, तेव्हा ते अत्यंत भाबडेपणाने म्हणाले, मी पुतिन यांनाच याबद्दल विचारून खात्री करेन. आपल्याच सैनिकांच्या हत्येचा संशय असलेल्या हुकूमशहाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याची ट्रम्प यांची ही वृत्ती अत्यंत घातक आणि बाळबोधपणाची आहे.पक्षाच्या मंचावरून सातत्याने साम्यवादाला विरोध करण्याचा आव आणणारे ट्रम्प प्रत्यक्षात मात्र रशिया आणि चीनसारख्या हुकूमशाही राजवटींसोबत मैत्रीचे चाळे करत आहेत. मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय संबंध ठीक आहेत, पण अमेरिकन सैनिकांचे बळी जात असताना हुकूमशहांचे लाड पुरवणे ही मुत्सद्देगिरी नसून देशहिताशी उघड तडजोड आहे.

निष्कर्ष: राजकीय लाचारी अन् भविष्यातील नामुष्की

इराण युद्ध हे ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणातील निष्फळता आणि अपयशाचे प्रतीक ठरले आहे. स्वपक्षीय नेत्यांचा विरोध, बड्या देणगीदारांची उघड बंडखोरी, सामान्यांची महागाईमुळे होणारी होरपळ आणि सैनिकांचे जात असलेले बळी या सर्व गोष्टींमुळे अमेरिकन जनतेचा संयम आता सुटत चालला आहे. रिपब्लिकन पक्षातील नेते केवळ ट्रम्प यांच्या राजकीय दबावाला आणि भीतीपोटी उघडपणे बोलण्याचे टाळत आहेत; परंतु खाजगीत मात्र सर्वांनाच या विनाशाची जाणीव झाली आहे.

ट्रम्प यांनी स्वतःच्या अहंकारापोटी आणि हुकूमशहांच्या प्रेमापोटी अमेरिकेला एका अशा दलदलीत ढकलले आहे, ज्यातून बाहेर पडणे आता अत्यंत कठीण झाले आहे. जर रिपब्लिकन पक्षाने वेळीच ट्रम्प यांच्या या आत्मघातकी धोरणांना लगाम घातला नाही, तर येणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकन जनता त्यांना असा धडा शिकवेल, ज्यातून सावरणे रिपब्लिकन पक्षासाठी अशक्य होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!