नांदेड (प्रतिनिधी) – स्वच्छता अभियान ६.० अंतर्गत भारतीय रेल्वेच्या वतीने आज देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ आणि स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विभागातील सर्व ७१ रेल्वे स्थानकांवर ‘रेल जनसंवाद’ तसेच त्यानंतर व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, आदिलाबाद, अकोला यांसह विभागातील इतर स्थानकांचा समावेश होता. ‘रेल जनसंवाद’चा मुख्य उद्देश रेल्वे अधिकारी, प्रवासी आणि विविध भागधारक यांच्यात थेट संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. या माध्यमातून प्रवाशांच्या अपेक्षा जाणून घेणे, रेल्वे सेवा व प्रवासी सुविधांशी संबंधित सूचना आणि तक्रारी प्राप्त करणे तसेच सेवांमध्ये आणखी कोणत्या क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहे, याचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानकांवरील स्वच्छता, स्वच्छताविषयक सवयी, रेल्वे परिसराचा जबाबदारीने वापर आणि रेल्वे स्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवासी व नागरिकांचा सक्रिय सहभाग याबाबत जनजागृती करण्यात आली. हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), नांदेड श्री. प्रदीप कामले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ‘रेल जनसंवाद’मध्ये सक्रिय सहभाग घेतल्यानंतर स्थानकावर आयोजित स्वच्छता उपक्रमातही प्रत्यक्ष सहभाग घेतला. परभणी रेल्वे स्थानकावर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) सी. एच. कल्याण राजू हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. पूर्णा रेल्वे स्थानकावर मुख्य वैद्यकीय अधीक्षक एम. श्रीनिवास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप कुमार दास यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. नांदेड विभागातील विविध स्थानकांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘जनसंवाद’ तसेच स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ‘रेल जनसंवाद’ कार्यक्रमात DRUCC, माजी DRUCC व ZRUCC सदस्य, स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापारी संघटना, तसेच विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला. जनसंवादादरम्यान प्रवासी व विविध भागधारकांनी प्रवासी सुविधा, स्वच्छता, स्थानकांवरील सुविधा, रेल्वे गाड्यांच्या सेवा तसेच रेल्वेशी संबंधित इतर विषयांबाबत सूचना, अभिप्राय आणि तक्रारी मांडल्या. आज प्राप्त झालेल्या सर्व सूचना व तक्रारी संबंधित विभागांकडून संकलित करून त्यांची छाननी करण्यात येईल. प्रचलित नियम व व्यवहार्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी सुधारात्मक कार्यवाही करण्यात येईल. जनसंवादानंतर राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमांत स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म आणि प्रवाशांसाठीच्या विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासोबतच प्रवासी व नागरिकांनी रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना प्रदीप कामले, DRM/नांदेड यांनी रेल्वे सेवा अधिक सक्षम व प्रवाशाभिमुख करण्यासाठी प्रवासी आणि विविध भागधारकांशी सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, ‘रेल जनसंवाद’ हा प्रवाशांच्या गरजा आणि अपेक्षा थेट जाणून घेण्याची तसेच त्यांच्या रास्त समस्या वेळेत सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. यावेळी त्यांनी प्रवासी आणि नागरिकांना रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी न राहता ती सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी बनली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. नांदेड विभागातील सर्व ७१ रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आलेल्या ‘रेल जनसंवाद’ आणि स्वच्छता अभियान ६.०च्या माध्यमातून स्वच्छ रेल्वे परिसर, सुधारित प्रवासी सुविधा, प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था आणि प्रवाशांना अधिक चांगला अनुभव देण्याच्या विभागाच्या कटिबद्धतेची पुनर्प्रचिती झाली. Kanthak Suryatal Post Views: 28 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये व्हीआयपी रोडवरील दुकान व भाजप कार्यालय पोकलेनने पाडले; कोटगीरे माय-लेकांसह १५ जणांवर गुन्हा दाखल