नांदेड (प्रतिनिधी)-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुले-आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक, लेखक तथा प्राध्यापक राजू सोनसळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत करून उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाकडे अधिकृतपणे अर्ज सादर केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे यांच्याकडे प्रा. सोनसळे यांनी उमेदवारीसाठी हा अर्ज सुपूर्द केला.

फुले-आंबेडकरवादी विचारधारेचा सातत्याने अभ्यास, लेखन आणि प्रसार करणारे प्रा. सोनसळे यांनी सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रात केलेल्या कार्याच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी मागितली आहे. पदवीधरांच्या मूलभूत प्रश्नांसोबतच शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण तसेच वंचित-बहुजन समाजाच्या हक्कांचे प्रश्न हे आपल्या राजकीय भूमिकेच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघ हा केवळ निवडणुकीच्या दृष्टीने नव्हे, तर सामाजिक व वैचारिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर फुले-आंबेडकरवादी चळवळीच्या अभ्यासकाने उमेदवारीसाठी अर्ज केल्याने या घडामोडीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे.

आता वंचित बहुजन आघाडी प्रा. राजू सोनसळे यांच्या उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे मराठवाड्यातील पदवीधर तसेच फुले-आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!