बालिका पंचायत उपक्रमाचे विशेष कौतुक;ग्रामसभेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नांदेड (जिमाका) – केंद्र सरकारचे सहसचिव पी. नरहरी यांनी येरगी येथे आयोजित ग्रामसभा व रिफॉर्म उत्सवात सहभागी होऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामविकासाच्या विविध विषयांवर ग्रामस्थांची मते, सूचना व अनुभव जाणून घेत त्यांनी शासनाच्या योजना आणि उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. रिफॉर्म उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लोककल्याणकारी उपक्रम आणि प्रशासकीय सुधारणांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली. यावेळी श्री. नरहरी यांनी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधून योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांची माहिती घेतली. योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. येरगी येथील बालिका पंचायत उपक्रमाची श्री. नरहरी यांनी विशेष दखल घेत कौतुक केले. ग्रामीण भागातील बालिकांना ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि निर्णयप्रक्रियेची जाणीव निर्माण करणे, हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी श्री. नरहरी यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली तसेच जलतारा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून जलसंधारणाची कामे, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामविकासाला गती देण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची यावेळी उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी तयार करण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स तसेच विविध शासन आदेशांची मांडणी श्री. नरहरी यांनी पाहिली. शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येत असलेल्या या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. ग्रामसभेस मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह जिल्हा परिषद स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी, गावस्तरावरील विविध विभागांचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ग्रामविकासाशी संबंधित विविध विषयांवर आपली मते, सूचना आणि अनुभव मांडले. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, शासनाच्या योजनांची माहिती आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांचा आढावा यामुळे येरगी येथील ग्रामसभा व रिफॉर्म उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले Kanthak Suryatal Post Views: 69 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भोकर पोलिसांची मोठी कारवाई: ७.५८ लाखांचा अवैध गुटखा व स्कॉर्पिओ जप्त; एकावर गुन्हा दाखल