लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अवैध मटका व जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवली. या कारवाईत जिल्ह्यातील तीन ठिकाणी छापे टाकून २२ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २ लाख ९७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व अंमलदारांचे पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी गांधी मार्केट परिसरातील एका शटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर कारवाई केली. तेथून १५ हजार ६१० रुपये रोख आणि ७ मोबाईल असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात इसमांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७१/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळ मार्केट ते सम्राट चौकाकडे जाणाऱ्या रोडलगत आर.के. बारच्या शेजारील शटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत ३९ हजार ४३० रुपये रोख व तीन मोबाईल असा २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पाच इसमांविरुद्ध गुन्हा क्रमांक ६७२/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. दरम्यान, लातूर शहरातील कारवायांसोबतच कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवेश्वर चौकाजवळ लाला मजकुरी यांच्या पत्र्याच्या शेडसमोर सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार खेळण्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात २० हजार १०० रुपये रोख, सात मोबाईल व दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ५७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दहा इसमांविरुद्ध गुन्हा क्रमांक २४४/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या तीनही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ७५ हजार १४० रुपये रोख, १७ मोबाईल आणि दोन मोटारसायकली, असा २ लाख ९७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, पोलीस हवालदार संदीप वाघाडे, पोलीस हवालदार गजानन डवरे यांच्यासह पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. खबर हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन ९१५०१००१०० हा मोबाईल क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाईनवर द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 225 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation न्यायालयाचा जैसे थे आदेश खिशात अन् मनपाची दादागिरी मैदानात! अजब पालिकेचा गजब कारभार;शाहजी उमपांनी घेतली दखल ज्ञानेश कुमारांना भारत रत्न की लोकशाहीच्या हत्येचे बक्षीस? निवडणूक आयोगाच्या महानाटकाचा पर्दाफाश!