मारवाड गल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिरात चोरट्यांचा धक्कादायक प्रताप; पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे शोधमोहीम नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या नांदेड शहरातील मारवाड गल्ली परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात चोरट्यांनी चक्क दर्शनाचा आव आणत भगवान लक्ष्मीनारायणाची मूर्ती लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरासह भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे लक्ष्मीनारायण मंदिरात आले. सुरुवातीला त्यांनी मंदिराची पाहणी करत काहीतरी विचारणा केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर दोघेही मंदिरातून बाहेर गेले. काही वेळाने पुन्हा मंदिरात प्रवेश केला आणि पुन्हा बाहेर पडले. मात्र, तिसऱ्यांदा परतताना त्यांनी सोबत पूजेसाठी फुले आणली. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देवाला फुले अर्पण केली आणि दर्शनाचा आव आणत संधी साधून लक्ष्मीनारायण भगवानाची मूर्ती घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल मानेकर,गायकवाड हे आपल्या अनेक सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिर परिसरासह आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांच्या हालचालींचा माग पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात काढला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली असून, सायबर शाखेचीही मदत घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि चोरट्यांच्या हालचालींच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. देवाच्या दर्शनाच्या नावाखाली मंदिरात प्रवेश करून देवाचीच मूर्ती चोरण्याचा हा प्रकार धार्मिक भावना दुखावणारा असून, पोलिसांसमोर चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आरोपींचा लवकरच शोध घेऊन त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-27-at-15.34.10-1.mp4 Kanthak Suryatal Post Views: 255 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड महापालिकेतील शिंदे गटाच्या नगरसेविकेच पद रद्द करा – ठाकरे सेनेची मागणी.