नांदेड (विशेष प्रतिनिधी) – आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर वाढल्याने बँकिंग फसवणूक, ऑनलाईन स्कॅम्स आणि सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करून निरपराध लोकांची फसवणूक करत असून अनेकजण आपली आयुष्यभराची कमाई गमावत आहेत. या गंभीर वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर, सायबर गुन्हेगारीशी लढा देण्यासाठी आणि फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःची जागरूकता आणि सतर्कता हीच सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली असल्याचे नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी स्पष्ट केले आहे. नांदेड पोलिसांचे आवाहन आणि फसवणुकीचे स्वरूप नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी एका पत्रकार परिषदेत सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्येंजने उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. रोहन यांनी सांगितले की, सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने राष्ट्रीय पातळीवरील हेल्पलाइन १९३० या क्रमांकावर कॉल करून आपली माहिती भरावी. फसवणूक झाल्यानंतर चोरीच्या पैशांची पुढची साखळी अत्यंत लांबलचक असते आणि हे पैसे अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले जातात. विशेष म्हणजे, ज्या लोकांच्या बँक खात्यांचा वापर या अवैध व्यवहारांसाठी केला जातो, त्यांना ते पैसे नेमके कशाचे आहेत याची साधी कल्पनाही नसते. त्यामुळे फसवणूक होताच वेळेत माहिती दिल्यास सायबर माध्यमातून गायब झालेले पैसे बँक खात्यांमध्येच रोखणे शक्य होते. सायबर फसवणुकीचे मुख्य प्रकार आणि भामट्यांचे तंत्र सायबर भामटे डिजिटल अरेस्ट, फेडेक्स पार्सल, कर अधिकारी, पार्ट टाईम जॉब, सीबीआय, कस्टम्स किंवा वीज वितरण कंपनी अशा २० हून अधिक युक्त्यांचा वापर करून निरपराध लोकांची फसवणूक करतात. डिजिटल अरेस्टचा बनाव: सीबीआय, कस्टम्स, पोलीस किंवा ट्रायच्या नावाने व्हिडियो कॉल करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैशांची उकळण केली जाते. मात्र, भारतीय कायद्यात अशा कोणत्याही डिजिटल अरेस्टची तरतूद नाही. अनधिकृत एपीके फाईल्स व मालवेअर: व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा सोशल मीडियावरील जाहिरातींद्वारे फ्री ॲप किंवा रिवार्डच्या नावाखाली अनधिकृत एपीके फाईल्स डाऊनलोड करायला लावल्या जातात. या फाईल्समुळे मोबाईलमध्ये सार्ट किंवा सायलेंट मालवेअर प्रवेश करतो, जो युझर्सच्या नकळत स्क्रीनचा एक्सेस मिळवतो तसेच ओटीपी, एसएमएस व बँकिंग डिटेल्स चोरतो. भीती व घाईगडबड दाखवणे: आत्ताच्या आत्ता पैसे भरा नाहीतर बँक खाते बंद होईल, अटक होईल किंवा वीज कापली जाईल अशी भीती दाखवून घाईगडबडीत पैसे उकळले जातात. ओटीपी व कॉल मर्जिंग फ्रॉड: कॉल मर्ज करून किंवा बँक अधिकारी असल्याचा बनाव करून युझर्सकडून ओटीपी, युपीआय पिन आणि कार्ड तपशील मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. सायबर सुरक्षेचा सुवर्णनियम आणि खबरदारीचे उपाय सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सायबर तज्ज्ञांनी खालील प्रमुख उपाय सूचवले आहेत: सुरक्षेचा सुवर्णनियम: कोणतीही अधिकृत संस्था, बँक किंवा सरकारी विभाग कधीही ग्राहकाकडून वैयक्तिक बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत नाही. जर कोणी दंड किंवा प्रक्रिया शुल्क वैयक्तिक खात्यात वळती करायला सांगत असेल, तर ती व्यक्ती सायबर ठग आहे हे ओळखावे. गोपनीयतेचे रक्षण: कोणतीही बँक दूरध्वनीवरून गुप्त क्रमांक मागत नाही, त्यामुळे ओटीपी, युपीआय पिन किंवा सीव्हीवी कोणालाही देऊ नये. मोबाईलचे सुरक्षा ऑडिट: सामान्य स्मार्टफोनमध्ये ५० ते ६० ॲप्स असतात, त्यामुळे मोबाईलमधील न वापरलेले किंवा अनोळखी ॲप्स काढून टाकावेत. कोणत्याही ॲपला कॉल्स, मेसेज किंवा गॅलरीचा एक्सेस का हवा आहे हे तपासून पाहावे. अधिकृत ॲप्सचा वापर: ॲप्लिकेशन्स फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरूनच डाऊनलोड करावीत. थर्ड पार्टी ॲप्सवर बँकांची देखरेख नसल्यामुळे व्यवहारांसाठी बँकेचे अधिकृत ॲप वापरावे. फसवणूक झाल्यास गोल्डन अवर मधील तातडीची कृती अनावधाने सायबर फसवणूक झाल्यास पहिल्या १ तासाचा काळ म्हणजेच गोल्डन अवर अत्यंत महत्त्वाचा असतो. या वेळेत घेतलेले योग्य निर्णय गमावलेली रक्कम परत मिळवून देण्यास मदत करतात: १. १९३० वर त्वरित संपर्क: फसवणूक होताच गृह मंत्रालय व आईफोरसी (I4C) द्वारे संचलित २४ तास कार्यरत असलेल्या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३० वर त्वरित कॉल करावा. २. बँक खाती व कार्ड्स ब्लॉक करणे: आपल्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून संबंधित बँक खाते किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्ड तात्पुरते ब्लॉक करावे. ३. पुरावे जतन करणे: व्यवहारांचे सर्व मेसेजेस, कॉल हिस्ट्री आणि बँक स्टेटमेंटचे स्क्रीनशॉट्स पुराव्यादाखल जतन करून ठेवावेत. ४. अधिकृत तक्रार नोंदवणे: एका तासाच्या आत सायबर पोलीस ठाणे गाठून किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी. नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर (cybercrime.gov.in) तक्रार नोंदवण्याची सोपी प्रक्रिया भारत सरकारच्या cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर घरी बसून ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी खालील टप्पे पूर्ण करावे लागतात: १. संकेतस्थळाला भेट द्या: cybercrime.gov.in हे पोर्टल उघडून File A Complaint पर्यायावर क्लिक करून अटी व शर्ती स्वीकाराव्यात. २. सिटिजन लॉगिन: Report Under Cyber Crime बटणावर क्लिक करून Citizen Login निवडावे. त्यात आपले राज्य, युझर नेम आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करून ओटीपी व कॅप्चा भरावा. ३. तक्रार अर्ज भरा: अर्जात घटनेचे तपशील, संशयित तपशील, तक्रारदार तपशील आणि पूर्वदृश्य व सबमिट हे ४ भाग असतात. ४. माहिती व पुरावे सबमिट करा: घटनेची माहिती देऊन संशयिताचे नाव, ओळखीचा पुरावा आणि स्वतःचा ई-मेल आयडी नोंदवावा. सर्व तपशील पडताळून अर्ज सबमिट करावा आणि तक्रारीची पीडीएफ फाईल डाऊनलोड करावी. याशिवाय नागरिकांच्या सुरक्षेसाठी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर Suspect Repository द्वारे संशयित मोबाईल नंबर, ई-मेल, खाते क्रमांक किंवा युआरएल तपासण्याची सोय देण्यात आली आहे. तसेच Report Suspect वैशिष्ट्याद्वारे नागरिक संशयित संकेतस्थळ युआरएल, व्हॉट्सॲप नंबर, टेलिग्राम हँडल्स किंवा सोशल मीडिया युआरएलची माहिती प्रशासनाला देऊन सायबर सुरक्षेत भागीदार बनू शकतात,असे डॉ.नीलाभ रोहन यांनी सांगितले. Kanthak Suryatal Post Views: 23 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून अहमदपूर येथे गुटखा जप्त गाडीपुरा घरफोडीचा गुन्हा काही तासांत उघडकीस