नांदेड (प्रतिनिधी) – सोमवारपासून देशभरात श्री गणेशाची स्थापना होणार असून सर्वत्र उत्सवाचे वातावरण पसरले आहे. परंतु, नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यावर या उत्सवाच्या काळात मनुष्यबळाच्या तीव्र टंचाईमुळे प्रचंड ताण आला आहे. शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या या पोलीस ठाण्यात अर्ध्या मनुष्यबळात दुपटीने काम करावे लागत असल्याने, पोलिसांसमोर उत्सवात कायदा व सुव्यवस्था तसेच शहराची सुरक्षितता राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यासाठी एकूण १४३ पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र, आजच्या परिस्थितीत प्रत्यक्षात केवळ ७१ कर्मचारी अभिलेखावर उपलब्ध आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे या ७१ जणांपैकी काही पोलीस कर्मचारी इतर ठिकाणी संलग्न म्हणून कार्यरत असल्याने, प्रत्यक्ष ठाण्यात हजर असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या ७१ पेक्षाही कमी होते. म्हणजे मंजूर संख्येच्या ५० टक्क्यांहून कमी असलेल्या या अपुऱ्या बळावरच वजीराबाद पोलिसांचा सर्व कारभार सुरू आहे.

गणेशोत्सवात श्री गणेशाची स्थापना व बंदोबस्त सांभाळत असतानाच वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड शहरातील सर्वात महत्त्वाची व संवेदनशील ठिकाणे येतात. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, रेल्वे स्थानक, बस स्थानक, पोलीस अधीक्षक कार्यालय, पवित्र श्री हजूर साहिब आणि गोदावरी नदीकाठाचा विस्तृत परिसर या सर्वांच्या सुरक्षेचा मोठा भार या मोजक्याच पोलिसांवर आहे. एका बाजूला सणाचा बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूला शहरातील प्रमुख शासकीय, धार्मिक व सार्वजनिक संस्थांचे रक्षण, असा दुप्पट कामाचा ताण हे पोलीस कर्मचारी सहन करत आहेत. इतक्या अपुऱ्या संख्येवर अहोरात्र काम करताना पोलिसांच्या कामातील गुणवत्ता, सचोटी, धैर्य आणि अविरत सेवा टिकवून ठेवणे अत्यंत कठीण बनले असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. मोजक्या पोलिसांवर कामाचा अमर्याद भार पडल्याने त्यांची कार्यक्षमता प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी त्वरित निर्णय घेण्याची नितांत गरज आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलून या पोलीस ठाण्यातील मनुष्यबळाची संख्या कमीत कमी ७५ ते ९० टक्क्यांपर्यंत वाढवून दिली, तरीही पोलीस कर्मचारी अधिक सक्षमतेने, सचोटीने आणि गुणवत्तेने आपले कर्तव्य बजावू शकतील. आगामी गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांचे मनोधैर्य खचू नये आणि शहराची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने मनुष्यबळ तातडीने वाढवून देऊन पोलिसांना दिलासा द्यावा, हेच प्रशासनाला अत्यंत नम्र आणि आर्जवाचे आवाहन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!