नांदेड जिल्ह्यासाठी २ सप्टेंबर रोजी ‘यलो अलर्ट’

विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी):- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी उद्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी एका दिवसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दि. २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

आकाशात वीज चमकत असल्यास घ्यावयाची काळजी

विजांच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास जवळपास सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली किंवा धोकादायक ठिकाणी थांबू नये. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर उभे राहणे टाळावे. घरामध्ये असताना विद्युत उपकरणे सुरू असल्यास ती त्वरित बंद करावीत. तारांचे कुंपण, विजेचे खांब तसेच इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्याबाहेर पडावे.

आकाशात वीज चमकत असताना घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करणे तसेच घरातील नळ, पाण्याच्या पाइपलाइन अथवा इतर विद्युत उपकरणांना स्पर्श करणे टाळावे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाखाली तसेच धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असल्यास उघड्या दरवाजातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहणे टाळावे. बाहेर थांबण्यापेक्षा घरात सुरक्षित राहणे अधिक सुरक्षित आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!