अर्धापूर पोलिसांची मोठी कारवाई; ८ लाख १७ हजारांचा गुटखा आणि पानमसाला जप्त

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : -नांदेड जिल्ह्यातील अवैध गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या ‘विशेष मोहिमे’अंतर्गत अर्थापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने चार चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. ३१ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एक चार चाकी वाहन मोठ्या प्रमाणात गुटखा आणि पानमसाला घेऊन येत आहे. त्यानुसार अर्थापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने नांदेड ते अर्थापूर पोलिस ठाण्याकडील रस्त्यावर सापळा रचला. पोलिसांनी तपासणी केली असता, महाराष्ट्र MH-14-EC-4677 क्रमांकाची मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) वाहनातून गुटखा व पानमसाला वाहतूक करण्यात येत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी वाहन चालक सय्यद मुक्तार सय्यद रसूल (वय – ३४, रा. पूर्णा, कानडखेड, जि. परभणी) याला ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली. या झडतीत पोलिसांच्या हाती खालीलप्रमाणे मुद्देमाल लागला:

· केसरमुक्त विमल पानमसाला (Kesar Mukt Vimal Pan Masala – King Pack) – एकूण ४४० पाकिटे.

· केसरमुक्त विमल पानमसाला (King Pack – 6) – एकूण ४४० पाकिटे.

· केसरमुक्त विमल पानमसाला (Big Pack) – एकूण ३३० पाकिटे.

· प्रिमियम V-1 जर्दा – एकूण ११०० पाकिटे.

 

जप्त करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची एकूण किंमत १७,२४० रुपये तर पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाची किंमत सुमारे ५,००,००० रुपये आहे. असा एकूण ८,१७,२४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी अर्थापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४७८/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३ सह इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून हा माल कोणाकडून पुरवठा करण्यात आला, तसेच त्याची पुढील विक्री कोणास करण्यात येणार होती, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी माणीक बेद्रे (उपविभाग नांदेड ग्रामीण) यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, सपोनि भास्कर कांबळे, पोउपनि भोसले आणि पोलीस अंमलदार गजानन शिंदे, गौतम कांबळे यांनी केली. नांदेड जिल्हा पोलिसांकडून अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!