पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमापांचा दणका; मटका-जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई!

नांदेड(प्रतिनिधी) : -नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यातील मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ३१ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली असा एकूण ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिल्यानंतर त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांना लातूर जिल्ह्यात रवाना करण्यात आले होते.

 

गुळखेड येथे जुगार अड्ड्यावर धाड

 

२८ ऑगस्ट २०२६ रोजी भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे गुळखेड येथे पथकाने कारवाई केली. बालाजी सुरवसे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच खंडू भोसले यांच्या हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

 

या कारवाईत ३४ हजार ३२० रुपये रोख, १५ मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ६० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात एकूण १७ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८०/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा तपास भादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

औसा शहरात मटका बुक्कीवर कारवाई

 

यानंतर पथकाने औसा शहरातील कालान गल्ली येथे अब्दुल अतीक शेख यांच्या इमारतीत सुरू असलेल्या मटका बुक्कीवर कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ८८० रुपये रोख आणि ६९ हजार ४०० रुपये किमतीचे १० मोबाईल फोन, असा एकूण ९२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणात एकूण १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९८/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्याचा तपास औसा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बालाजी चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

३१ आरोपींवर कारवाई; २५ मोबाईल व दोन मोटारसायकली जप्त

 

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३१ आरोपींवर कारवाई केली. त्यांच्याकडून ५७ हजार २०० रुपये रोख, २५ मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसावळे, पोलीस गणेश राठोड, पोलीस संदीप वाघाडे आणि पोलीस गजानन उडेर यांनी सहभाग घेतला.

 

पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले.

 

अवैध व्यवसायाची माहिती देण्याचे आवाहन

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील मटका, जुगार अथवा इतर अवैध व्यवसायांची माहिती ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!