नांदेड (प्रतिनिधी) : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडजवळील गुरुद्वारा मातासाहिब परिसरात गुरुवारी खंजीराने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या झटापटीत बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या प्रकरणातील हल्लेखोराची ओळख जसपालसिंह (वय ६२) अशी निष्पन्न झाली असून तो पुणे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. जसपालसिंह हा पुणे न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होता. मागील सुमारे दोन वर्षांपासून तो नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट गावाजवळ असलेल्या माता साहिब गुरुद्वारात सेवा करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर गुरुद्वारा बाबा तेजासिंह मास्टरजी डेरामुखी यांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती आहे.
दर्शन आटोपून बाहेर पडताना हल्ल्याचा प्रयत्न
सुखबीरसिंह बादल हे पत्नी तथा माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि दोन मुलींसह दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आले आहेत. विविध गुरुद्वारांचे दर्शन घेण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. गुरुवारी ते गुरुद्वारा मातासाहिब येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते पायऱ्यांवरून खाली येत असताना जसपालसिंह अचानक त्यांच्या दिशेने आला. त्याच्या हातात खंजीर असल्याचे दिसताच सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जसपालसिंह बादल यांच्या दिशेने येताना ‘सरेंडर, सरेंडर’ असे ओरडत होता. त्याने हल्ल्याचा प्रयत्न करताच नांदेड एसपीयूचे अधिकारी संतोष केंद्रे यांनी प्रसंगावधान राखत त्याच्यावर झडप घातली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे जसपालसिंहला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.
झटापटीत बादल यांच्या हाताला दुखापत
हल्लेखोराला पकडण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीदरम्यान त्याच्या हातातील खंजीर बादल यांच्या उजव्या हाताला लागल्याने त्यांना दुखापत झाली. हल्लेखोराला पकडताना पोलीस अधिकारी संतोष केंद्रे हे देखील जखमी झाल्याची माहिती आहे. दोघांवरही उपचार करण्यात येत आहेत.
सुखबीरसिंह बादल यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्लेखोर त्यांच्या इतक्या जवळपर्यंत पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, सुरक्षारक्षकांसह पोलीस अधिकारी संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हल्ल्याची तीव्रता वाढण्यापासून रोखण्यात यश आले.
हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू
पोलिसांनी जसपालसिंहला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने हल्ल्याचा प्रयत्न का केला, त्यामागे नेमका कोणता उद्देश होता, हा प्रकार पूर्वनियोजित होता का, तसेच त्याच्यामागे अन्य कोणी व्यक्ती किंवा संघटना आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.
घटनेनंतर गुरुद्वारा मातासाहिब परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दरम्यान, बादल यांची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. घटनेमुळे नांदेडसह संपूर्ण पंजाबच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
