नांदेड (प्रतिनिधी) – आज नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांच्या तक्रारी संयमाने ऐकून घेत संबंधित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. दर महिन्याप्रमाणे आपल्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये अश्याच जनसुनावण्या घेतल्या जातात त्यामुळे नागरिकांना न्याय मिळतो आणि प्रलंबित तक्रारींचा आढावा घेता यावा, या उद्देशाने ते पोलीस अधीक्षक कार्यालयात जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधतात. आज नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात तब्बल 17 तक्रारदारांनी आपल्या विविध समस्या आणि तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षकांसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारीची सविस्तर माहिती घेत त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ज्या प्रकरणांमध्ये पोलीस विभागाच्या अधिकारक्षेत्राबाहेरील बाबी होत्या, त्या तक्रारदारांना कायदेशीर प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करून पुढील पर्याय समजावून सांगितले. मात्र या जनसुनावणीत एका महिलेने केलेल्या तक्रारीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वाजेगाव येथील रहिवासी इरफाना शेख यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप करत पोलीस उपमहानिरीक्षकांकडे धाव घेतली. इरफाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह 2015 मध्ये शेख सलीम यांच्याशी झाला असून त्या पती व तीन वर्षांच्या मुलीसह वाजेगाव येथे राहतात. त्यांचे सासू-सासरे, दीर आणि नणंद अर्धापूर येथे वास्तव्यास आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी एका तथाकथित बाबाने त्यांच्या कुटुंबाला घरात लपलेले धन असल्याचा दावा करत ते बाहेर काढण्यासाठी प्रथम बकऱ्याचा बळी देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बकऱ्याचा बळी देण्यात आला, मात्र लपलेले धन बाहेर आले नाही. त्यानंतर आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा बळी देण्याबाबत दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक आरोप इरफाना यांनी केला. या प्रकाराला विरोध करून तक्रार दिल्यानंतर स्वतःला व पतीला मारहाण झाल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात त्यांनी सासरे शेख मेहबूब, सासू गौसिया, दीर शेख इजाज, नणंद शबाना यांच्यासह इतर संबंधितांची नावे तक्रारीत नमूद केली आहेत. इरफाना यांनी पोलीस उपमहानिरीक्षकांसमोर अशीही तक्रार केली की, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेकदा संपर्क साधूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. फोन केल्यावर प्रतिसाद मिळत नाही किंवा फोन उचलून बाजूला ठेवला जातो, असा आरोप त्यांनी केला. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे लक्षात घेत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने तक्रारीची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करण्याच्या कडक सूचना दिल्या. तसेच अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. दरमहा आयोजित होणाऱ्या या जनसुनावणीमुळे नागरिकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर थेट आपली बाजू मांडण्याची संधी मिळत असून अनेक प्रलंबित प्रकरणांना गती मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा या बैठकीत पाहायला मिळाले.आज या जनसुनावणीत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,सुरज गुरव,जिल्ह्यातील सर्व पोलीस उप अधीक्षक, शहरातील सर्व पोलीस निरीक्षक जवळपासचे पोलीस निरीक्षक उपस्थीत होते. Kanthak Suryatal Post Views: 620 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Gen Z चा महाविजय! अखेर भाजप सरकारे झुकली; विद्यार्थ्यांवरील सर्व FIR मागे! बौद्धिक दिव्यांग तरुणीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी; नांदेड सत्र न्यायालयाचा निकाल