नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या काही पोलिसांविरुद्ध प्राप्त झालेल्या अर्जांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलिसांना पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमागील नेमकी कारणे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी, पोलिसांच्या कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अमलदार गजानन किडे यांनाही मुख्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित जमादारांकडून चुकीची कामे होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांकडे पोहोचल्याने वरिष्ठ स्तरावरून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या प्राथमिक तपास सुरू असून संबंधित पोलिसांकडून स्पष्टीकरण मागविण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रशासकीय निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे या कारवाईकडे पोलिस दलातील शिस्त आणि पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
