नांदेड (प्रतिनिधी) – श्रीनगर परिसरात 6 एप्रिल रोजी घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून तुरुंगात असलेल्या आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने नव्याने अटक करण्यात आलेल्या महिलेसह एकूण पाच आरोपींना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. 6 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास श्रीनगर भागात अनिकेत उर्फ सोनू अशोक कल्याणकर (वय 35) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. घटनेनंतर भाग्यनगर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत चंद्रविजय हौसाजीराव मंगनाळे, पियुष उर्फ प्रसाद उर्फ ऋषी शिवाजी शिंदे, मधुसूदन उर्फ कृष्णा माधव जोगदंड आणि रवी उर्फ रोहित राजेश लोट रा. नांदेड या चार आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान तपासात पुढे आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुरुंगात असलेला आरोपी मुक्तेश्वर उर्फ गोलू चंद्रविजय मंगनाळे याची आई इंदुताई चंद्रविजय मंगनाळे हिला देखील काळ सायंकाळी अटक केली. तिची अटक झाल्यानंतर पूर्वी अटकेत असलेल्या चार आरोपींसह सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी तपासासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगत कोठडी वाढविण्याची मागणी केली.सोबतच तुरुंगात असलेला आरोपी गोलू मंगनाळेला हस्तांतरण वारंट वर आणून सर्व आरोपी समोर तपास करायचा आहे असा मुद्दा पोलिसांनी मांडला. बचाव पक्षाने मात्र इंदुताई मंगनाळे यांना कर्करोगाचा आजार असल्याने पोलीस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने इंदुताई चंद्रविजय मंगनाळे यांच्यासह पाचही आरोपींना 11 एप्रिलपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

