नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नांदेड शहरातही विविध भागांमधून आकर्षक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व डीजेसह भव्य मिरवणुका आयोजित केल्या जातात.
यंदा डीजे वापराबाबत पोलीस प्रशासनाकडून जयंती मंडळांना परवानगी दिली जाणार नसल्याची चर्चा सुरू असल्याने समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेत जयंती मंडळांना डीजेसह मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी युवा नेते बंटी लांडगे यांनी केली आहे.
आंबेडकर जयंती हा सामाजिक एकात्मता, प्रेरणा व अभिमानाचा उत्सव असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन उत्सव शांततेत व उत्साहात पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले. तसेच मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व भीमसैनिक एकजुटीने प्रशासनास पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जयंती उत्सव शांततेत पार पडावा यासाठी आयोजक मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन लांडगे यांनी केले.
