भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भोकर येथे 31 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान बस स्थानकाजवळील पानटपरी समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव आदित्य काशीनाथ डुब्बेवाड (वय 23, रा. शेंबोळी ता. मुदखेड) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य याच्यासोबत जुन्या भांडणाचा राग बाळगत आरोपी अभिजीत प्रभाकर कल्याणकर (रा. भोसी) व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी साथीदाराने मोटारसायकलवर येत त्याला लक्ष्य केले. आरोपींनी आदित्यवर अचानक हल्ला चढवत धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आदित्यचे वडील काशीनाथ पोतन्ना डुब्बेवाड (वय 45, व्यवसाय–शेती, रा. शेंबोळी, ता. मुदखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 168/2026, कलम 103(1), 3(5) भारतीय न्याय संहिता – 2023 अन्वये आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार करणारं आहेत. या निर्घृण हल्ल्यामुळे भोकऱ्यासह शेजारील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी पोलिसांची मोहीम वेगात सुरू आहे.
