नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील देगलूर नाका परिसरात रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान कथित पत्रकार शेख याहिया याने पत्रकारितेची अब्रूच चव्हाटयावर आणली असे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद फसियोद्दीन यांनी केले. शेख याहिया याने खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित पत्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीं सय्यद फसियोद्दीन,अन्सार अहमद,हबीब बागवान,शेख बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
नगरसेवक सय्यद फसीयोद्दीन (प्रभाग क्र. 11) यांनी सांगितले की, 30 तारखेच्या रात्री देगलूर नाका रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम ते स्वतःच्या खर्चातून करत होते. यावेळी माझा महाराष्ट्र या पोर्टलशी संबंधित असल्याचा दावा करणारा याहिया नावाचा व्यक्ती घटनास्थळी आला आणि चित्रीकरण करू लागला.
फसीयोद्दीन यांच्या आरोपानुसार, संबंधित व्यक्तीने तुम्ही या कामातून पैसे कमावत आहात, त्यामुळे आम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगत सुमारे 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर मध्यस्थ बशीर लाला मार्फत 50-60 हजार रुपयांत तडजोड करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, आम्ही स्वतःच्या खर्चातून जनहिताचे काम करत असल्याने पैसे देण्यास नकार दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, पैसे न दिल्यास चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करण्याची आणि तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्याच दिवशी संबंधित व्यक्तीने पोलिस ठाण्यात एनसी (नोंद) केली असल्याचेही सांगण्यात आले.
या प्रकरणी नगरसेवकांसह इतर साक्षीदारांनी पोलिस निरीक्षकांकडे तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार परिषदेत उपस्थित इतर लोकप्रतिनिधींनीही संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकारांचे आरोप असल्याचे सांगितले.शेख याहिया हा महानगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करून बसला आहे.त्याच्या विरुद्ध बलात्कार आरोपाचा गुन्हा दाखल आहे. तसेच आम्हाला आता अनेक जणांचे फोन येत आहेत त्यात ते याहिया ने आम्हाला घरचे भांडण असतांना पैसे घेतल्याचे सांगत आहेत. या बाबत आम्ही पीडितांना मदत करून त्यांचे गुन्हे सुद्धा दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अश्या वृत्तीचे काही लोक पत्रकारितेच्या नावाखाली चुकीचे कृत्य करत असून त्यामुळे संपूर्ण पत्रकारितेची प्रतिमा मलिन होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात पोलिस प्रशासनावर विश्वास असल्याचे सांगत, संबंधितावर लवकरच योग्य कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
